चंद्रपूरमध्ये अनेक नागरी वस्त्यांत शिरले पाणी, ५५१ लोकांना सुरक्षितस्थळी हलवले, २२ ट्रकचालकांची सुटका

चंद्रपूर : १४ जुलै – सलग पाच दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे चंद्रपूर शहरातील अनेक नागरी वस्त्यांत पाणी शिरले आहे. ५५१ लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. गडचांदूर-धानोरा मार्गावरील भोयगाव जवळ २ दिवसांपासून २२ वाहनचालक आपल्या ट्रकमध्येच अडकून पडले होते. त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे.
इरई, वैनगंगा, झरपत, वर्धा नदीच्या पाण्याचा प्रवाह सतत वाढत आहे. यामुळे गडचांदूर येथे २२ वाहन चालक ट्रकबाहेर पडू शकले नाही. याबाबत माहिती मिळताच, गडचांदूर पोलीस निरीक्षक सत्यजित आमले यांच्या नेतृत्वात चंद्रपूर जिल्हा पोलिसांच्या बचाव पथकाने वाहनचालकांना सुखरूप बाहेर काढले. चंद्रपूर महापालिका आपत्ती व्यवस्थापन पथकाद्वारे पूरग्रस्त भागातील ५९१ नागरिकांना सुरक्षित स्थळी आणण्यात आले आहे.
रहमत नगर, सिस्टर कॉलोनी, राष्ट्रवादी नगर, तुलसी नगर, ठक्कर कॉलोनी येथे बचाव मोहिम राबवून नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. महापालिकेच्या महाकाली कन्या शाळेत ११४, माना प्राथमिक शाळा येथे ८०, शहिद भगतसिंग शाळा येथे ३५, महात्मा फुले शाळा येथे २१६, किदवई शाळा येथे ८५, जेष्ठ नागरिक संघ येथे ४६ तर अग्रसेन भवन येथे १५ नागरिकांना ठेवण्यात आले असून त्यांची व्यवस्था व देखभाल करण्यात येत आहे. महापालिकेद्वारा आपत्ती व्यवस्थापन पथक सतत कार्यरत असून अनेक रहिवासी भागात पाणी शिरल्याने नागरिकांना बाहेर काढण्याची मोहिम सुरू आहे.

Leave a Reply