संपादकीय संवाद – हा शरद पवारांचा निरर्थक उपदव्याप ठरेल

शिवसेनेत वेळोवेळी फूट पाडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हेच कारणीभूत होते, अश्या आशयाचे वक्तव्य शिवसेनेतील शिंदे गटाचे प्रवक्ते आ. दीपक केसरकर यांनी केले असल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. अर्थात केसरकारांच्या या आरोपांमध्ये अगदीच तथ्य नाही असे म्हणता येणार नाही, शिवसेनेतील पहिले मोठे बंड १९९१ मध्ये छगन भुजबळांच्या नेतृत्वात झाले होते, त्यामागे शरद पवार होते हे उघडे गुपित आहे. भुजबळांना काँग्रेसमध्ये आणून त्यांचे पुनर्वसन करण्याचे काम त्यावेळी पवारांनी केले होते.
शिवसेनेला खच्ची करण्यामागे शरद पवार असल्याचा आरोप वेळोवेळी केला जातो. त्यामागे निश्चित अशी कारणमीमांसा आहे. शिवसेनेची स्थापना होण्यापूर्वी मुंबईत कॉम्रेड श्रीपाद डांगे आणि जॉर्ज फर्नांडिस या दोन कामगार नेत्यांचे वर्चस्व होते, हे दोघेही यशवंतराव चव्हाणांच्या ऐकण्यातले होते, त्यामुळे महाराष्ट्र सोडून दिल्लीत गेल्यावरही महाराष्ट्राची सत्तासूत्रे चव्हाणांनी आपल्याच हातात ठेवली होती. त्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक त्रस्त होते, म्हणून नाईकांनीच बाळ ठाकरेंना पडद्यामागून ताकद दिली, आणि शिवसेना उभी केली, परिणामी डांगे, जॉर्ज या दोघांचेही मुंबईतील वर्चस्व संपले, त्यामुळे यशवंतराव चव्हाणांचेही महाराष्ट्रातील वर्चस्व कमी झाले, हा इतिहास आहे.
शरद पवार हे यशवंतराव चव्हाणांचे मानसपुत्र म्हणून ओळखले जातात. त्यामुळे त्यांनी त्या काळापासूनच शिवसेना संपवण्याचा विडा उचलला होता, असे तत्कालीन जाणकार सांगतात. शिवसेनेतील पहिले बंड पवारांनीच घडवून आणले, त्यामुळे पुढची बंडेही त्यांनी घडवली असल्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेषतः राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना उभी केली त्यामागे पवारांनीच ताकद दिली होती. असे बोलले जाते.
महाराष्ट्रात महाआघाडीच्या सरकार आणण्यामागेही शरद पवारांचेच राजकारण होते, हे जगजाहीर आहे. मात्र असे करत असतांना शिवसेनेतील एखादा ज्येष्ठ नेता मुख्यमंत्री म्हणून ते बसवू शकले असते, मात्र तिथेही उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री बनवून त्यांनी अननुभवी व्यक्ती मुख्यमंत्री केली. परिणामी महाराष्ट्राचे प्रशासन कोलमडले आणि उद्धव ठाकरे अकारण बदनाम झाले, त्याचवेळी उद्धव ठाकरेंचे संघटनेकडेही दुर्लक्ष झाले, पवारांनाही हेच हवे होते, असे बोलले जाते.
आता नुकतेच झालेले बंडही पवारांनीच प्रायोजित केले असल्याचे बोलले जाते. दीपक केसरकारांनीही त्याबाबतीत सूचक वक्तव्य केले आहे. इथे प्रश्न असा येतो की बाळासाहेब ठाकरेंना किंवा आता उद्धव ठाकरेंना ही बाब का कळू नये? बाळासाहेबांनी रक्ताचे पाणी करून उभारलेली संघटना अशी बरबाद का होऊ द्यावी?
अर्थात शिवसेना संपवून पवार काही फारसे साधतील अशी शक्यता नाही. महाराष्ट्रात शिवसेना संपली म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस वाढेल अशी शक्यता मुळीच नाही. आपल्याला मोठे व्हायचे असेल तर आपली रेषा मोठी करणे हे केव्हाही श्रेयस्कर असते इथे पवार राष्ट्रवादी काँग्रेस मोठी करण्याआधी शिवसेनेची रेषा पुसायला निघाले आहेत. यातून पवारांना फारसे सध्या करता येणार नाही. पवारांचा हा निरर्थक उपदव्याप ठरणार आहे. हे निश्चित.

अविनाश पाठक

Leave a Reply