आर्मीतील सुभेदाराने केला तरुणीवर अत्याचार

नागपूर : १३ जुलै – नागपूर शहरातील सोनेगाव पोलिस ठाणे हद्दीत एका तरुणीसोबत आर्मीतील नायक सुभेदाराने जबरी अत्याचार केल्याची घटना पुढे आली आहे. शादी डॉटकॉमवरून ओळख झाल्यानंतर आरोपीने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर लग्नाला नकार दिला. परिणामी, पीडितेने सोनेगाव पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, २३ ऑक्टोबर २0२१ ते १ जून २0२२ या कालावधीत आरोपी अमोल एकनाथ दुकळे (वय ३0, रा. वॉर्ड १, पालखेड, हनुमान गल्ली, नाशिक) याने शादी डॉटकॉमवरून प्रोफाईल नागपूर शहरातील एका २४ वर्षीय तरुणीला मोबाईलवरून फोन केला. आरोपी अमोलने फोनवरून बोलताना सांगितले की, मी तुमचे प्रोफाईल पाहिले आणि मला ते आवडले आहे. मी आर्मीमध्ये नायक सुभेदार असल्याचे सांगितले. आरोपी अमोलने फोनवरून पीडितेला विश्वासात घेतले. त्यानंतर त्यांच्या दोघांमध्ये सातत्याने बोलणे सुरू होते. यातून त्यांचे संबंध विश्वासात बदलले आणि त्यांच्यातील नाते लग्नाच्या निर्णयापर्यंत पोहोचले. दरम्यान, आरोपी हा पीडितेला भेटण्याकरिता नागपूर शहरात आला होता. त्याने सोनेगाव पोलिस ठाणे हद्दीतील एका हॉटेलमध्ये खाली बुक केली. येथे त्याने पीडितेला बोलावले. त्याच्या सांगण्याप्रमाणे ती हॉटेलमध्ये आली. येथे आल्यानंतर आरोपीने तिला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यासोबत जबरी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर पीडितेने आरोपी अमोलला लग्नासंदर्भात विचारणा केली. परंतु, अमोल तिला टाळटाळ करू लागला. त्यानंतर त्याने थेट तिला धमकी देत लग्नास नकार दिला. परिणामी पीडिता थेट सोनेगाव पोलिस ठाण्यात पोहोचली आणि अमोलविरोधात तक्रार दाखल केली. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम ३७६, ३७६ (२), (एन), ५0६ भादंवि अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिस पुढील तपास करीत आहेत.

Leave a Reply