गडचिरोलीत पूरस्थिती भयंकर, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री तातडीने गडचिरोलीला रवाना

गडचिरोली : ११ जुलै – गडचिरोलीला पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे. मुसळधार पावसामुळे गडचिरोलीतील नदी, नाले आणि ओढ्यांना पूर आला आहे. पुढील 2 दिवस गडचिरोलीत रेड अलर्ट देण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून खबरदारीचे उपाय करण्यात येत आहेत. अशात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ गडचिरोली दौऱ्याचं नियोजन केलं आहे. ते आज दुपारी नागपूरला पोहोचतील. तिथून ते गडचिरोलीला जातील.
दुपारी चार वाजता एकनाथ शिंदे हे अतिवृष्टी आणि पूरग्रस्त भागाचा पाहणी दौरा करणार आहेत. त्यानंतर संध्याकाळी 6.30 वाजता पूर परिस्थितीबाबत गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा प्रशासन सोबत आढावा बैठक घेणार आहेत.
हवामान विभागाकडून रेड अलर्ट, 3 दिवस शाळा, कॉलेजला सुट्टी
गडचिरोलीला पावसाचा जोरदार तडाखा बसलाय. मुसळधार पावसामुळे गडचिरोलीतील नदी, नाले आणि ओढ्यांना पूर आलाय. पुढील २ दिवस गडचिरोलीत रेड अलर्ट देण्यात आलाय. याच पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून खबरदारीचे उपाय करण्यात येतायत. पुढील 3 दिवस शाळा आणि कॉलेजला सुट्टी देण्यात आलीय. तसंच अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकानं बंद राहणार आहेत. मात्र शासकीय कार्यालयं सुरु राहणार आहेत. गडचिरोलीच्या भामरागड-आलापल्ली मार्गावरील अनेक नदी नाल्यांना पूर आलाय. त्यापैकी तुमर्गुंडा नाल्यावर पर्यायी रस्ता वाहून गेल्यानं ग्रामस्थांना अडचणीचा सामना करावा लागतोय. या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. पर्यायी रस्ताच वाहून गेल्यानं जीव मुठीत घेऊन प्रवास करण्याची वेळ इथल्या ग्रामस्थांवर आली आहे.
दरम्यान, या पावसाच्या पार्श्वभूमीवर शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. अधिकाऱ्यांना देखील मुख्यालयात राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच NDRF ची टीम आणि SDRF च्या टीमला देखील सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, काही ठिकाणी मुसळधार पावसामुळं नदी नाल्यांना पूर आले आहेत. तर काही ठिकाणी गावात पाणी शिरल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. राज्यातील मुंबईसह, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे सातारा, कोल्हापुरात या भागात जोरदार पाऊस कोसळताना दिसत आहे. तसेच गडचिरोलीमध्ये देखील पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. तिथे अनेक नद्यांना पूर आला आहे. तसेच नागपूर, चंद्रपूर, वाशिम, वर्धा जिल्ह्यातही मोठा पाऊस कोसळताना दिसत आहे.

Leave a Reply