संपादकीय संवाद – अमोल मिटकरींनी भाजपच्या लोकप्रियतेची चिंता करण्यापेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकप्रियतेची काळजी करावी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या दोन दिवसात पंतप्रधान, राष्ट्रपती आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांच्या दिल्लीत भेटी घेतल्या, या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वाचाळ आमदार अमोल मिटकरी यांनी ट्विट करून एकनाथ शिंदे आता भाजपची उरलीसुरली लोकप्रियता संपवतील अशी टीका केली आहे. हे बघता मिटकरींना भाजपच्या लोकप्रियतेबाबत्त बरीच चिंता लागली आहे, असे दिसते.
अमोल मिटकरींनी भाजपच्या लोकप्रियतेची चिंता करू नये, त्यापेक्षा त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपणाऱ्या लोकप्रियतेचा विचार करावा अशी पंचानामाची नम्र सूचना आहे. भाजपच्या लोकप्रियतेची उरलीसुरली या शब्दात संभावना करतांना मिटकरींनी थोडे वास्तवाचे भान ठेवायला हवे होते. याच भाजपने १९८९ नंतर प्रथमच २०१४ मध्ये लोकसभेत स्पष्ट बहुमत मिळवले होते, हे स्पष्ट बहुमत लोकप्रियता नसती तर मिळाले नसते. २०१४ नंतर भाजपची लोकप्रियता घटली, असे म्हणावे तर २०१९ मध्ये भाजपला २०१४ च्या तुलनेत २१ जागा जास्त मिळाल्या होत्या. त्यानंतरही जिथे जिथे पोटनिवडणुका झाल्या तिथे भाजपने आघाडी घेतलेली दिसते. याशिवाय गेल्या ८ वर्षात देशातील दोन तृतीयांश पेक्षा अधिक राज्यांमध्ये भाजपची सरकारे आली आहेत. अजूनही भाजपची घोडदौड सुरूच आहे. लोकसभेपाठोपाठ राज्यसभेतही भाजप स्पष्ट बहुमताच्या मार्गावर आहे. हे बघता भाजपची लोकप्रियता संपते आहे, आणि फारच थोडी लोकप्रियता उरली आहे हा निष्कर्ष हास्यास्पद ठरतो.
या पार्श्वभूमीवर अमोल मिटकरी ज्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत, त्या राष्ट्रवादी काँग्रेसची अवस्था अतिशय दयनीय आहे. १९९९ मध्ये स्थापन झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला कधीही लोकसभेत २५ च्या वर खासदार निवडून आणता आलेले नाहीत. महाराष्ट्रात स्वबळावर १०० आमदारसुद्धा त्यांनी कधी निवडून आणलेले नाहीत, दरवेळी त्यांच्या आमदारांची संख्या घसरलेलीच दिसते, महाराष्ट्रात काही मोजके जिल्हे वगळता राष्ट्रवादी काँग्रेसला कुठेही स्थान नाही. राष्ट्रवादीची स्थापना झाली, त्यावेळी देशातील काही प्रांतांमध्ये पी. ए. संगमा यांच्यासारखे बोटावर मोजण्याइतके काही खासदार राष्ट्रवादीसोबत होते, नंतर काळाच्या ओघात तेही राष्ट्रवादीपासून दुरावले आहेत, आता महाराष्ट्रातील ५-७ जिल्हे सोडले तर राष्ट्रवादी काँग्रेसचे कुठेही अस्तित्व नाही. हळूहळू हे अस्तित्वदेखील कमी होत चालले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांनी आतापर्यंत तोडफोड करून आणि प्रसंगी तडजोड करून सत्ता मिळवली आहे. स्वबळावर सत्ता मिळवणे त्यांना कधीही शक्य झालेले नाही. आजही पवार राजकारणात आहेत, तोवरच राष्ट्रवादी काँग्रेसला भवितव्य आहे, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची किती शकले होतील, याचे उत्तर काळच देणार आहे.
या पार्श्वभूमीवर अमोल मिटकरी यांनी भाजपच्या लोकप्रियतेची चिंता करू नये, त्यांनी आपल्या पक्षाचा विचार करावा आणि आपला पक्ष संपतो आहे, असे दिसल्यावर आणखी कुठे घरठाव करायचा याची सोय बघावी, इतकेच इथे सुचवावेसे वाटते.

अविनाश पाठक

Leave a Reply