उमेश कोल्हे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी राणा दाम्पत्याचा कार्यकर्ता, तपासात आले समोर

अमरावती : १० जुलै – शहरातील औषधी विक्रेते उमेश कोल्हे यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी इरफान खान हा खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा यांचा खास कार्यकर्ता असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे त्याच्या फेसबुक पेजवर लोकसभा निवडणुकीत खासदार नवनीत राणा यांच्या प्रचाराच्या अनेक पोस्ट तसेच नवनीत राणा विजयी झाल्यावर त्यांना शुभेच्छा देणाऱ्या विविध पोस्ट त्याने शेअर केल्या आहेत.
काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या पाठिंब्याने अमरावती लोकसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार म्हणून 2019 च्या निवडणुकीत रिंगणात असणाऱ्या नवनीत राणा यांचा प्रचार करण्यात इरफान खान हा आघाडीवर होता. इरफान खान हा राणा समर्थक असून नवनीत राणा या लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्यावर मुबारक हो भाभी असा उल्लेख करीत त्याने खासदार नवनीत राणा यांच्या विजयाच्या जल्लोषाशी संबंधित अनेक पोस्ट शेअर केल्या होत्या. 23 मे 2019 रोजी इरफान खान येणे खासदार नवनीत राणा यांचा फेट्यावर असणारा फोटो शेअर करीत त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या या संदर्भात त्याच्या फेसबुक पेजवर आता देखील अनेक फोटो आणि व्हिडिओ असल्याचे आढळून येते.
उमेश कोल्हे हत्याकांड्यानंतर उमेश कोल्हे यांच्या घरी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी तीन वेळा भेट दिली. राणा दंपत्याने आज कोल्हे यांच्या घरासमोर हनुमान मंदिरात कोल्हे दांपत्यासह हनुमान चालीसा पठण देखील केले. या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा मिळावी अशी मागणी राणादांपत्याकडून केली जात असताना त्यांचा कार्यकर्ताच मुख्य आरोपी आहे याबाबत त्यांना विचारले असता आमचा इरफान खान याच्याशी कुठलाही संबंध नाही तो आमच्या संघटनेचा कधीही कार्यकर्ता नव्हता. निवडणूक काळात अनेकांनी आमच्या विजयाचा जल्लोष साजरा केला त्यामध्ये नेमकी कोण कसे व्यक्ती होते आम्हाला माहिती नसल्याचे आमदार रवी राणा यांनी म्हटले आहे.

Leave a Reply