वर्धेत मुसळधार, देऊरवाडा येथे ११० घरात शिरले पाणी

वर्धा : ८ जुलै – जिल्ह्यातील आर्वी तालुक्यात मंगळवारी अतिवृष्टी झाली. आर्वी- देऊरवाडा मार्गावर नाल्या न काढल्याने पावसाचे पाणी गावात थोपले. रात्री झालेल्या पावसामुळे देऊरवाडा गावातील ११० घरांमध्ये पाणी शिरले. रस्त्यावर, घरात तीन ते चार फूट पाणी साचले होते. काही घरांची पडझड झाल्यामुळे गावकऱ्यांचे नुकसान झाले. तसेच तालुक्यातील बाराशे हेक्टर शेतजमीन खरडून गेल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे.
आर्वी तालुक्यात १७४.४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील हा सर्वाधिक पाऊस आहे. अतिवृष्टीमुळे देऊरवाडा येथील काही घरांची पडझड झाली आहेत. अशा कुटुंबांची व्यवस्था शाळेत करण्यात आली आहे. खूबगाव येथील आसुलकर यांच्या शेतातील कुक्कुटपालन शेडमधील १० हजार कोंबड्याचा मृत्यू झाला. हेमंत आसुलकर व गजानन आसुलकर या दोन भावंडांचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे आर्वी तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने प्रशासनाने तातडीने पंचनामा करून मदत करावी अशी मागणी शेतकरी करीत आहे.
आर्वी तालुक्यातील निम्न वर्धा प्रकल्पाचे सात दरवाजे उघडण्यात आले आहे. १८६ क्युमेंक मीटरने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणाची जलपातळी २८२.७९० मीटर असून त्याची टक्केवारी ७१.९६ टक्के इतकी आहे. पाणी वर्धा नदी पात्रात सोडण्यात आले आहे. नदीकाठच्या गावांना सतर्क करण्यात आले आहे.

Leave a Reply