मोहम्मद जुबेर यांना पाच दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर

नवी दिल्ली : ८ जुलै – सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी अल्ट न्यूजचे सहसंस्थापक मोहम्मद जुबेर यांना पाच दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर केला आहे. २०१८ च्या एका वादग्रस्त ट्विटप्रकरणी अटक जुबेर यांना दिल्ली पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. यापूर्वी पटियाळा न्यायालयाने जुबेर यांचा जामीन अर्ज फेटाळला होता.
सर्वोच्च न्यायालयाने मोहम्मद जुबेर यांना पाच दिवसांचा अंतरिम जामीन काही अटी शर्थींसह मंजूर केला आहे. मोहम्मद जुबेर यांनी दिल्ली सोडून कुठेही जाऊ नये. तसेच कोणतेही ट्वीट करू नये, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे.
दरम्यान, या प्रकरणाच्या सुनावणी वेळी कॉलिन गोन्साल्विस यांनी जुबेर यांची बाजू मांडली. गोन्साल्विस यांनी ट्विटचा हवाला देत जुबेर यांनी काहीही चुकीचे केले नसल्याचे न्यायालयापुढे सांगितले. तसेच द्वेष करणाऱ्यांची माहिती जगापुढे आणणारा व्यक्ती तुरुंगात आहे. मात्र, द्वेष परसवणारे बाहेर फिरत असल्याचे गोन्साल्विस यांनी न्यायालयात म्हटले.
तत्पूर्वी उत्तर प्रदेश पोलिसांकडून बाजू मांडणारे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी जुबेर यांना जामीन न देण्याची शिफारस केली होती. जुबेर यांनी केवळ ट्वीट केले नसून त्यांना गुन्हे करायची सवय आहे. तसेच जुबेर यांच्याकडून अनेक तथ्य लपवून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असल्याचे तुषार मेहता यांनी न्यालायलापुढे सांगितले.

Leave a Reply