डोहात आढळले दीर व वाहिनीचे मृतदेह

नागपूर : ८ जुलै – रामटेक तालुक्यातील तुमसर मार्गावरील भंडारबोडीजवळ असलेल्या भिमानटोला मॅगनिज खदानीच्या डोहामध्ये बुधवार, ६ जुलै रोजी एका महिलेचे तर गुरुवार ७ जुलै रोजी एका तरुणाचे प्रेत सापडल्याने परिसरात खळबळ उडाली. ते दोन्ही मृतदेह भिमानटोला येथील असल्याचे निष्पन्न झाले.
मैनावती असुराज धुर्वे (वय ३८ ) तसेच लक्ष्मण गुलाब धुर्वे (२७) रा. भिमानटोला अशी मृतकांची नावे आहेत. पोलिस स्टेशन रामटेक येथून मिळालेल्या माहितीनुसार, दोघांनीही सदर डोहात आत्महत्या केली असून, बुधवारी महिलेचे प्रेत आढळून आले तर गुरुवारी तरुणाचे प्रेत आढळून आले. पंचनामा करून रामटेक पोलिसांनी दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविले व नंतर आप्तेष्टांच्या सुपूर्द केले. रामटेक पोलिसांनी कलम १७४ सीआरपीसीनुसार र्मग दाखल केला असून, पुढील तपास पो.नि. प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक संजय खोब्रागडे व लांजेवार करीत आहे.
लक्ष्मण धुर्वे हा अविवाहित असून, मैनावतीचा पती आसुराज धुर्वे याचे दुसरे लग्न होय. आसुराजच्या पहिल्या पत्नीचा बाळंतपणात मृत्यू झाल्याने आसुराजने मैनावतीशी दुसरे लग्न केले. आसुराजला पहिल्या पत्नीपासून तीन मुली तर मैनावतीपासून एक आठ वर्षांचा मुलगा आहे.

Leave a Reply