अमरावतीच्या सावरखेडमध्ये ढगफुटीसदृश्य पाऊस, पिकासह शेतातील जमीन गेली वाहून

अमरावती : ८ जुलै – मोर्शी तालूक्यातील सावरखेड गाव हे चार हजार नागरिकांचे गाव आहे. या गावात सर्वात जास्त शेतकरी व शेतमजूरांची वस्ती आहे. पाऊस सूरू होण्याआधी येथील शेतकऱ्यांनी कर्ज घेऊन व मजूरी करुन त्यातून येणाऱ्या पैशांमधून बी- बियाणे घेऊन शेतात पेरली. मात्र, मुसळधार पावसाने शेतकऱ्याचे स्वप्न एका क्षणात उद्ध्वस्त केले.
पाऊस पडून या वर्षी चांगली आवक येणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले होते. मात्र गेल्या आठवड्याभर पाऊस न पडल्याने शेतकरी चिंतेत होता. परंतु काल रात्री झालेला पाऊस बळीराजाच्या डोळ्यात पाणी घेऊन आला. सावरखेड गावात काल चक्क ढगफुटीसदृश्य पाऊस बरसला आणि याच पावसाने शेतकरी संपूर्णतः कोसळला. शेतातील पिके झोपली. इतकंच नाही तर अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील जमीनच पुराच्या पाण्यात वाहून गेली. अनेक शेतकऱ्यांच्या शेतात तलावासारखी स्थिती निर्माण झाली. दूरवरून वाहत असलेला नाला थेट शेतकऱ्यांच्या शेतातून वाहत गेल्याने अनेक शेतकऱ्यांचे लाखोंच्या वर नुकसान झाले. अनेकांच्या शेतात तीन फुटांपर्यंत पूर वाहत गेला. मोठ्या वृक्षाची मुळे बाहेर पडली. शेतातील माती गायब होऊन दगड बाहेर पडले एवढी भयानक परिस्थिती या गावात निर्माण झाली. अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने घरातील वस्तुंचेही नुकसान झाले.
शेतात जाणाऱ्या पांदण रस्त्यावर पुरात वाहून आलेले लाकडे जमा झाल्याने पायवाटेवरुन जाताना कसरत करावी लागत होती. त्यातून मार्ग काढून आम्हाला थेट शेतात जावे लागत होते. कोणीचा तहसीलदार, तलाठी विरोधात तर कोणी येतील लोकप्रतिनिधी विरोधात आक्रोश व्यक्त केला आहे. आ यशोमती ठाकूर यांच्याबाबत ही अनेक शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. तर बुधवारी खा. नवनीत राणा यांनी बाजूच्या नरपिंगलाई गावाची पाहणी केली मात्र आमच्या गावात आल्या नाही असा ही नाराजीचा सूर दिसून आला. आरपीआयचे ॲड दीपक सरदार यांनी सुद्धा प्रशासनाला अल्टिमेट दिला असून तात्काळ पंचनामे करुन शेतकऱ्यांना दोन लाख सरसकट नुकसाभरपाई शासनाने देण्यात यावी अन्यथा आंदोलन केले जाईल, असं त्यांनी म्हटलं आहे.
मुसळधार पाऊस होऊन तीन दिवस झाले असतानाही तलाठी, तहसिलदार, आमदार, खासदार पाहणी करायला आले नाही . तलाठी म्हणतात आम्हाला आदेश आला नाही, अशा प्रतिक्रिया सुद्धा शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या. मात्र, यावर येथील तलाठी तायडे यांना विचारले असता त्यांनी घराची पंचनामा केले आता अधिकारी आल्यावर शेतातील पंचनामे करू, अशी प्रतिक्रिया दिली आहे. तीन दिवस झाले असतानाही येथील प्रशासनाला जाग का आली नाही? असा आता प्रश्न निर्माण होत आहे.

Leave a Reply