चैतन्य – वर्षा किडे-कुळकर्णी

7 july shradhanjali

माझे सासरे जेष्ठ साहित्यिक स्व .श्यामकांत कुळकर्णी यांना म्हणजे भाऊंना (घरचे संबोधन ) रेडिओ ऐकायची प्रचंड आवड. लेखन, वाचन करतानाही पार्श्वभूमीला रेडिओ कायम सुरू असायचा. रेडिओची साथ क्षणभरही सुटत नसे. घरातल्या घरात या खोलीतून त्या खोलीत जाताना रेडिओ सोबत घेऊन फिरायचे. अगदी चहा, नाश्ता जेवतांना सुद्धा ताटाबाजूला रेडिओ असायचा. झोपताना तर डोक्याशी मग हळूच तो दुलईत पोटाशी घेऊन हळु आवाजात ऐकणं सुरूच असायचं . कुंटुंबातील इतर सदस्यांना त्रास होऊ नये म्हणून काळजी घ्यायचे . सकाळी 5 वाजताच रेडिओ सुरू व्हायचा. तो ऐकत 1तास पडून राहायचे . मग हळूच सहा वाजता दुलईबाहेर पडायचे . आम्हालाही रेडिओ अलार्म असायचा .
मलाही रेडिओ ऐकायची खूप आवड व सवय असल्याने लग्नानंतर मी त्यांचा रेडिओ मागत असे. पहिले पहिले ते द्यायचे मला. मी रेडिओ ऐकता ऐकता झोपून जायचे, रेडिओ सुरू राहून जायचा. परिणामत: सेल लवकर संपायला लागले. यासाठी एकदा मला त्यांनी चांगलच सुनावलं होतं. इतर कुणी रेडिओला हात लावलेलं त्यांना आवडत नाही हे लक्षात आल्यावर मी सासरीे राहत असेपर्यंत माझ्या रेडिओ ऐकण्याच्या आवडीला पूर्णविराम दिला. पुढे मी माझा घेतला. असो.
आकाशवाणीवर दिवसभराच्या कार्यक्रमात माझ्या कार्यक्रमाबद्दल ऐकलं की भाऊ मला आवर्जून सांगायचे की आज तुझा कार्यक्रम आहे बरं . तो कार्यक्रम आवर्जून ऐकायचे आणि त्यावर एक्सपर्ट कॉमेंटही द्यायचे. वृद्धापकाळाने थकल्यामुळे त्यांना घरातही चालणं व्हायचं नाही तर दोन रेडिओ दोन खोल्यात ठेवले होते. एक लेखन कक्षात तर दुसरा दिवाणखान्यात. एका जरी रेडिओचे सेल संपले तर ते बेचैन व्हायचे . लगेच ह्यांना म्हणजे प्रकाशला फोन करून सेल आणायला लावायचे. प्रत्येक रेडिओ त्यांना अपटूडेट लागत असे. त्यांच्या रेडिओ ऐकण्याच्या सवयीमुळे घरात कायम चैतन्य राहत असे. शेवटच्या श्वासापर्यंत ( शुद्ध हरपेपर्यंत ) त्यांनी रेडिओ ऐकला. बरेचदा दुपारी प्रकाश भेटायला जायचे तर अंगावर शाल घेऊन एका खुर्चिवर डोकं टेकवून , डोळे मिटून दुसऱ्या खुर्चिवर पाय ठेऊन पहुडलेले असायचे. गाढ झोप लागलेली असायची त्यांना. कसे आहेत भाऊ ? या माझ्या प्रश्नाला प्रकाशने एकदा मला तसा फोटोच दाखवला. फोटो पाहून मला अगदी गहिवरून आलं होतं . तो त्यांचा शेवटचा फोटो कायम स्मरणात राहील.
आज ते नाहीत. 26 जानेवारी 22 ला त्यांचं देहावसान झालं. सासुबाई गेल्यावर रेडिओ आणि लेखणीच्या साथीने त्यांनी दोन वर्ष कसेबसे काढलेत . दर्शवत नसले तरी मनाने खचले होते. पत्नीच्या जाण्याने त्यांच्या जीवनातलं चैतन्य हरपलं होतं आणि भाऊंच्या जाण्याने त्यांच्या वाणीचं आणि रेडिओ अबोल झाल्याने आकाशवाणीरूपी घरातलं चैतन्य कायमचं हरवलं आहे.आता सासरी घरी गेल्यावर भाऊ आणि त्यांचा रेडिओ अबोल झाल्यानं शांत घर खायला उठतं. त्यांच्या दोन रेडिओ पैकी एक रेडिओ माझ्या कन्येनी शलाकाने कुळकर्णी आजोबांची म्हणजे भाऊंची आठवण म्हणून बंगलोरला नेलाय .(किडे आजोबांचे मनगटी घड्याळ ती आठवण म्हणून रोज घालते. )
सध्या भाऊंच्या घराची रंगरंगोटी सुरू आहे. सुपरव्हिजनसाठी मी तिकडे गेले तर फाटकातून आत शिरल्या शिरल्या रेडिओचा आवाज कानी पडला. घरात पाऊल ठेवताच सुरू असलेल्या रेडिओमुळे घरात चैतन्य जाणवलं. कोण रेडिओ ऐकतंय म्हणून मी चटकन चारही खोल्या फिरले . क्षणभर भाऊ त्यांच्या खोलीत लेखन करत आहेत आणि बाजूला रेडिओ सुरू आहे असा भास मला झाला. हे कसं शक्य आहे? मीच मला प्रश्न केला. भानावर आले . पाहते तर रेडिओ प्रेमी पेंटर अंकीत रंगकाम करता करता भाऊंचा रेडिओ ऐकत होता. गाणं गुणगुणत होता. तब्बल सहा महिन्यांनी घरात रेडिओचे स्वर गुंजले होते आणि चैतन्य परतलं होतं.

आमच्या भाऊंचा आज वाढदिवस. कालच घडलेल्या या प्रसंगाला त्या निमित्ताने शब्दबद्ध करत त्यांच्या स्मृतीस वाहिलेली ही शब्दरूपी आदरांजली.

वर्षा किडे-कुळकर्णी

Leave a Reply