ठाकरेंच्या मर्सिडीजला धडकतोय् ‘रिक्षा’वाला ! – विनोद देशमुख

(एकनाथ शिंदे यांची) रिक्षा सुसाट सुटली आहे. केव्हा अपघात होईल सांगता येत नाही. -इति उद्धव ठाक रे
(माझ्या) रिक्षाच्या स्पीडपुढे (उद्धव ठाकरेंच्या) मर्सिडीजचा स्पीड फिका पडला. -इति एकनाथ शिंदे
शिवसेना पक्षप्रमुख आणि कट्टर शिवसैनिक यांच्यात मंगळवारी झडलेला हा ‘सामना’ शिवसेनेतील वस्तुस्थिती चव्हाट्यावर आणणाराच आहे. बाळासाहेबांच्या काळात सर्वसामान्यांची असलेली शिवसेना आता उच्चभ्रूंची झाली आहे, पूर्वीची सहजता जाऊन तेथे काॅर्पोरेट कल्चर आले आहे, जमिनीतील मुळांशी नाते तुटून नेते आकाशात तरंगू लागले आहेत… वरील संवाद-युद्ध त्याचेच प्रतीक होय.
एकनाथ शिंदे हे प्रारंभीच्या काळात (आॅटो)रिक्षा चालवायचे, याचा उल्लेख गेले दहाबारा दिवस वारंवार केला जात आहे. संतापाने तसे करणेही समजू शकते. परंतु, शिंदे आज तेरा कोटी जनतेचे मुख्यमंत्री झाल्यावर सुद्धा रिक्षावाला म्हणून त्यांना हिणवायचे हा घराणेशाहीचा अहंकार आहे, सर्वसामान्यांचा घोर अपमान आहे.
1966 ते 2002 ही 36 वर्षे बाळासाहेब ठाकरे यांच्या हातात पूर्ण सूत्रे असतानाचा काळ आठवा. समाजातील अतिसामान्य वाटणारी माणसे त्यांनी मोठी केली, प्रतिष्ठित केली, जोपासली. साबीर शेख (कामगार), सांदीपन भुमरे (चौकीदार), गुलाबराव पाटील (पान टपरी चालक) यांच्यासारखी माणसे मंत्रिपदापर्यंत पोहोचवली. अशा लोकांना मानसन्मान देणारे एकमेव नेते असलेले बाळासाहेब कुठे अन् याच लोकांना त्यांच्या मुळावरून हिणवणारे उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि आजचे इतर नेते कुठे ? असे करून आपण शिवसेनेच्या मुळावरच घाव घालत आहोत, पायाच खिळखिळा करीत आहोत, स्वत:च्या पायावर दगड पाडून घेत आहोत, याचेही भान त्यांना राहिलेले नाही.
2002 मध्ये उद्धव कार्याध्यक्ष झाल्यापासून शिवसेनेत महानगरी काॅर्पोरेट कल्चरचा शिरकाव झाल्याचे दिसते. साधेपणाचे रूळ शिवसेनेने बदलले अन् आज 15-20 वर्षात गाडीच घसरण्याची स्थिती आली ! 56 वर्षातील सर्वात मोठा उठाव झाला आणि शिवसेनेच्या ताब्याची लढाई सुरू झाली. घराणेशाही विरुद्ध लोकशाही, असा संघर्ष सुरू झाला.
समाजातील ज्या आर्थिक स्तरातील आणि छोट्यामोठ्या जातीजमातींमधील, स्वप्नात सुद्धा वाटणार नाही अशा सामान्य लोकांना आपुलकीने जवळ करणाऱ्या बाळासाहेबांचे चाहते आणि त्यांच्या उपकाराचे नकारात्मक भांडवल करणारे सध्याचे त्यांचे वारस, हाच शिवसेनेतील खरा तिढा आहे. त्याला खऱ्या हिंदुत्वाचा तडकाही लाभला आहे. या दोन आघाड्यांवर लढताना घराणेशाहीचे खांब डळमळल्याचे स्पष्ट दिसून येते. यात, सुसाट रिक्षाला धनुष्य बाण रोकू शकेल की वाघच जखमी होईल, ते बघायचे !

विनोद देशमुख

Leave a Reply