अफगाणिस्तानच्या धर्मगुरूंची नाशिकमध्ये गोळ्या घालून हत्या

नाशिक : ६ जुलै – नाशिकमध्ये अफगाणिस्तानच्या ३५ वर्षीय धर्मगुरुंची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. ख्वाजा सय्यद चिश्ती असं या धर्मगुरुंचं नाव असून ‘सुफी बाबा’ नावाने त्यांना ओळखलं जात होतं. डोक्यात गोळी झाडण्यात आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. हत्या केल्यानंतर हल्लेखोर कारमधून पळून गेले. पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरु आहे.
या हत्येमध्ये चालक प्रमुख संशयित असल्याचं पोलीस अधिक्षक (नाशिक ग्रामीण) सचिन पाटील यांनी सांगितलं आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सय्यद चिश्ती अनेक वर्ष नाशिकमधील येवलामध्ये वास्तव्यास होते. या हत्येमागे कोणतंही धार्मिक कारण असल्याची शक्यता पोलिसांनी फेटाळली आहे. संपत्ती किंवा पैशांच्या वादातून हत्या झाल्याचं निष्पन्न होत आहे. मात्र पोलीस इतर सर्व बाजूंची पडताळणी करत आहे असं पोलिसांनी सांगितलं आहे.
“आरोपी आणि पीडित गाडीतून आले होते. येवल्यात दोन तीन ठिकाणी पूजा केल्यानंतर त्यांनी जेवण केलं. यानंतर एमआयडीसीत एके ठिकाणी जमीन खरेदी करायची असल्याने पूजा करायचं असल्याचं सांगत चालक आणि इतर आरोपी सय्यद चिश्ती यांना तिथे घेऊन गेले. यानंतर गाडीत बसत असताना आरोपींनी गोळी घालून त्यांची हत्या केली आणि फरार झाले,” अशी माहिती सचिन पाटील यांनी दिली आहे.
यामध्ये तीन मुख्य आरोपी असून एकाची चौकशी केली जात आहे. चालक सध्या फरार आहे अद्याप कोणाला अटक करण्यात आलेली नाही असंही सचिन पाटील यांनी सांगितलं आहे.

Leave a Reply