मध्यावधी झाल्यास शिवसेना १०० जागांवर विजयी होईल – संजय राऊत

मुंबई : ५ जुलै – सध्याची परिस्थिती पाहता आता मध्यावधी निवडणुका झाल्यास शिवसेना १०० जागांवर विजयी होईल, असा दावा शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे. उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनात झालेल्या बैठकीत जिल्हाप्रमुखांना माझ्यासोबत लढा असे सांगितले. आता राज्यात मध्यावधी निवडणुका झाल्यास सर्व चित्र स्पष्ट होईल. कोण जिंकणार, कोण हरणार, याचा फैसला तात्काळ होईल, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. आम्हाला शिवसेनेच्या १०० जागा जिंकून येतील, याचा विश्वास असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले. ते मंगळवारी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
सध्याच्या बंडखोरीमुळे महाराष्ट्रातील लोकांच्या मनात जी चीड पाहायला मिळत आहे. आमदार सोडून गेले म्हणजे मतदार गेले, असा अर्थ होत नाही. एकनाथ शिंदे हे काल बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकावर जाऊन नतमस्तक झाले असले तरी इतिहासात त्यांची नोंद वेगळ्या पद्धतीने होईल, असे संजय राऊत यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणावर टिप्पणी केली. काल मी प्रवासात होतो. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचे भाषण ऐकले नाही. पण आज ते वाचलं. सभागृहात विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका मांडावी लागते. पण एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात शिवसेना का सोडली याचा खुलासा दिला. यापूर्वी नारायण राणे, छगन भुजबळ यांनी पक्ष सोडला तेव्हाही त्यांनी अशीच भाषा वापरली होती. पक्षाशी प्रतारणा करून एखादा नेता दुसरीकडे जातो तेव्हा त्याला खुलासे करणारे, भावनांना हात घालणारे भाषण करावे लागते. माझ्यावर कसा अन्याय झाला, हे वारंवार सांगावे लागते. या न्यायाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाषण चांगले झाले, असे संजय राऊत यांनी म्हटले.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणाऱ्या बंडखोर आमदारांकडून संजय राऊत यांना लक्ष्य करण्यात आले होते. उद्धव ठाकरे यांच्याभोवती असणाऱ्या चार डोक्यामुळे पक्षाचे वाटोळे झाले, असा बंडखोर आमदारांचा सूर होता. या टीकेला संजय राऊत यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. या चार लोकांमुळेच कालपर्यंत तुम्हाला मिळाली होती. हे चार लोक सतत पक्षाचेच काम करत होते. आजही हे चार लोक पक्षाचेच काम करत आहेत. गेली अडीच वर्षे तुम्ही सत्तेत होता. त्यापूर्वीही तुम्ही सरकारमध्ये होता. आज तुम्ही ज्या चार लोकांना बदनाम करत आहात, ते शिवसेनेचे निष्ठावंत आहेत, असे संजय राऊत यांनी ठणकावून सांगितले.

Leave a Reply