विधानसभेत गुलाबराव पाटील यांची संजय राऊतांवर घणाघाती टीका

मुंबई : ४ जुलै – आम्ही उद्धव ठाकरे यांची साथ सोडली या गोष्टीचं आम्हाला दु:ख आहे. ही गोष्ट आमच्या मनातही सलत आहे. पण उद्धव ठाकरे यांच्याभोवती असलेल्या चार लोकांच्या कोंडाळ्याने त्यांना बावळट बनवले आहे. ज्यांची निवडून यायची लायकी नाही, ते आम्हाला बोलतात. आमच्या मतांवर खासदार होतात, अशा शब्दांत शिवसेनेचे बंडखोर आमदार गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर घणाघाती टीका केली. ते सोमवारी शिंदे-फडणवीस सरकारने मांडलेला बहुमताचा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर सभागृहात मांडण्यात आलेल्या अभिनंदन प्रस्तावावरील चर्चेत बोलत होते.
यावेळी गुलाबराव पाटील यांनी शिवसेनेविरुद्ध बंडखोरी केलेल्या आमदारांची बाजू दमदारपणे लावून धरली. अजितदादांना १०० आमदार निवडून आणायचेत, बच्चू कडूंना १० आमदार निवडून आणायचे, मग आमचं काय? आमचं घर जळतंय, घरातून लोकं पळत आहेत. अजितदादा माझ्याजागी तु्म्ही असता तर तुम्हीही उठाव केला असता. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर आम्ही मातोश्रीवर गेलो. त्यावेळी आम्ही म्हटले की, एकदा एकनाथ शिंदेंची बाजू ऐकून घ्या. तेव्हा संजय राऊत यांनी म्हटले की, तुम्हालाही तिकडे जायचे असेल तर जा. आम्हाला गटारातील घाण, डुक्कर म्हटलं गेलं. ज्यांची लोकांमधून निवडून यायची लायकी नाही, ते आम्हाला बोलतात. आम्हाला डुक्कर बोलता आणि आमच्याच मतांवर खासदार म्हणून निवडून जाता. हे कोण सहन करणार?,असा सवाल गुलाबराव पाटील यांनी विचारला. शिवसेना सोडून बाहेर पडण्यात केवढा मोठा धोका आहे, हे आम्हालाही माहिती आहे. एकीकडे काँग्रेस-राष्ट्रवादीसारखे विरोधी पक्ष दुसऱ्या बाजूला अडीच वर्षे ज्या भाजपशी जमलं नाही ते आहेत. मात्र, आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला, असे गुलाबराव पाटील यांनी म्हटले.
आदित्य ठाकरे महाराष्ट्रात फिरले नाहीत. आदित्य साहेब मंत्री होते, ते महाराष्ट्रात फिरू शकले असते. एकदा आदित्य ठाकरेंचे दौरे चेक करा. एकटे एकनाथ शिंदे महाराष्ट्रात फिरले, जळगावात ते पाचवेळा आले. शरद पवार राज्यात फिरतात, अजितदादा फिरतात. पण आमचे नेते का नाही आले? आमचं हे दुःख सर्वांना समजलं असेल की का गेलो, असे गुलाबराव पाटील यांनी म्हटले.

Leave a Reply