प्रणयक्रीडा करण्यापूर्वी बेशुद्ध होऊन प्रियकराचा मृत्यू, उत्तेजक गोळ्यांच्या सेवनाने घडला प्रकार

नागपूर : ४ जुलै – जिल्ह्यातील सावनेर/सिल्लेवाडा येथील स्थानिक केशव लॉजमध्ये २७ वर्षीय प्रियकराने प्रेयसीसोबत प्रणयक्रीडा करण्यापूर्वी उत्तेजक गोळ्यांचे अतिसेवन केल्याने बेशुद्ध होऊन मृत्यू झाल्याची विचित्र घटना रविवारी ३ जुलै रोजी दुपारी घडल्याचे उघडकीस आले आहे. अजय जंगलूजी परतेकी (धापेवाडा) असे मृतक प्रियकराचे नाव आहे. तो व्यवसायाने वाहनचालक होता. २१ वर्षीय नर्स त्याची प्रेयसी असून ती पांढुर्णा, मध्यप्रदेश येथील रहिवासी आहे.
प्राप्त माहितीनुसार, अजयने प्रणयक्रीडा करण्यापूर्वी गोळ्यांचे सेवन केले होते. काही वेळातच तो बेशुद्ध पडल्याची माहिती प्रेयसीने प्रियकराच्या धापेवाडा येथील मित्राला दिली. तत्काळ मित्र धापेवाडा येथून चारचाकीने सावनेर येथील केशव लॉजवर पोहोचला. त्याला स्थानिक खासगी डाॅक्टरांकडे उपचारार्थ हलविले. तोपर्यंत अजय जिवंत होता, अशी माहिती त्याच्या मित्रांनी दिली.
अजयची प्रकृती गंभीर असल्याने स्थानिक डाॅक्टरांनी त्याला सावनेर येथील ग्रामीण रुग्णालयात भरती करण्याचा सल्ला दिला. मात्र तत्पूर्वी अन्य डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. अजयच्या खिशात उत्तेजना देणाऱ्या गोळ्या डॉक्टरांना मिळाल्याची माहिती आहे. डॉक्टरांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी विचारपूस करण्यासाठी पांढुर्णा, मध्यप्रदेश येथील प्रेयसीला ताब्यात घेतले. मृतकाचे त्याच्या प्रेयसीसोबत तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. येत्या दोन महिन्यांत दोघेही लग्न करणार होते. अजय रविवार असल्याने सकाळी पांढुर्णा येथे गेला. तिला सोबत आणून थेट सावनेर येथील केशव लॉज गाठले.
प्रेयसीशी प्रणय करण्यासाठी उत्तेजना देणाऱ्या गोळ्यांचे सेवन केले. काही वेळाने तो खाली पडून मूर्च्छित झाला. याप्रकरणी पोलिसांनी प्रेयसीचे बयाण नोंदवून आकस्मिक मृत्यूची नोंद केली. मृत्यूचे नेमके कारण जाणून घेण्यासाठी शवविच्छेदन अहवाल आल्यावरंच अधिक बोलणे योग्य होईल, अशी भूमिका पोलिसांची आहे. मृतकाचे मित्र घटनास्थळी येण्यापूर्वी प्रेयसीने घटनेची माहिती लॉजमालकाला देऊन दवाखान्यात नेले असते, तर कदाचित त्याचा जीव वाचला असता, अशी चर्चा परिसरात आहे.

Leave a Reply