अंबाझरी तलावात बुडून २ युवकांचा मृत्यू

नागपूर : ४ जुलै – अंबाझरी तलाव शहरातील पर्यटनाचे स्थळ आहे. अन्य दिवसाच्या तुलनेत रविवारी येथे एकच गर्दी असते. असेच या ठिकाणी पर्यटनाचा आनंद घेण्याकरिता चार मित्र आले. यातील एकाची चप्पल चिखलाने भरल्यामुळे तो तलावाच्या काठावर चप्पल धुवायला गेला आणि पाय घसरून पडला. तो खोल पाण्यात गटांगळय़ा खात असतानाच त्याने दिलेल्या वाचवा.. वाचवा.. अशा आर्त हाकेला ‘ओ’ देत एका मित्राने तलावात उडी घेतली. परंतु, दोघांनाही पोहता येत नसल्यामुळे त्यांचा तलावाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. मिहिर शरद उके (१९, इंदोरा) आणि चंद्रशेखर किशोर वाघमारे (२0, लष्करीबाग) अशी मृतक तरुणांची नावे आहेत.
मान्सून शहरात दाखल झाल्यानंतर वातावरणात गारवा पसरला असून निसर्गदेखील फुलला आहे. अशा अल्हाददायी वातावरणात अंबाझरी येथील निसर्गाचे सौंदर्य बघण्याकरिता मोठय़ा संख्येत नागरिक या ठिकाणी येतात. दरम्यान, ३ जुलै रोजी रविवार असून पावसाची रिपरिप सुरू होती. अशातच या ठिकाणी मोठी गर्दी होती. येथेच रविवारी दुपारी बारा वाजता मिहीर उके, चंद्रशेखर वाघमारे, अक्षय मेर्शाम आणि बंटी हे चौघेही मित्र तेथे आले होते. तलाव काठावरून चालक असताना पावसाच्या रिपरिपीमुळे जमीनीवरील चिखलात मिहिरची चप्पल भरली. चप्पल धुण्याकरिता मिहिर हा तलावाच्या काठावर पोहचला. चप्पल धूत असतानाच त्याचा पाय घसरला आणि तो थेट तलावात पडला. तलावात पाणी जास्त असून मिहिरला पोहता येत नव्हते. त्यामुळे तो खोल पाण्यात गटांगळय़ा खाऊ लागला. तो बुडत आहे असे त्याला वाटताच त्याने त्याचा मित्र चंद्रशेखर याला वाचवा.. वाचवा.. असा आवाज दिला. अशातच चंद्रशेखरने मित्राचा जीव वाचविण्याकरिता पाण्यात उडी घेतली. परंतु, त्यालाही पोहता येत नसल्यामुळे ते दोघेही तलावात बुडले आणि त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, एका मित्राने एकाने अंबाझरी पोलिसांना आणि अग्निशमन विभागाला यासंदर्भात माहिती दिली. माहिती मिळताच पोलिस आणि अग्निशमन विभागाचे कर्मचारी या ठिकाणी पोहोचते झाले. तासभराच्या मेहनतीनंतर दोनही तरुणाचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. दरम्यान, मिहिर आणि चंद्रशेखर हे पाण्यात बुडत असताना या ठिकाणी तलावाच्या काठावर मोठय़ाप्रमाणात गर्दी होती. परंतु, यापैकी कुणीही या दोघांना वाचविण्याकरिता पुढाकार घेतला नाही. केवळ बघ्यांची भूमिका घेतली.

Leave a Reply