सडेतोड – वीरेंद्र (भाई) देवघरे

स्वप्नभंग – जबरदस्त राजकीय खेळी

शिंदे यांचे नाव मुख्यमंत्री म्हणून पुढे आले आणि संपुर्ण महाराष्ट्रात हल्लकल्लोळ माजला. अपेक्षित नाव फडणवीसांचे, पदाला प्रगल्भ न्याय देऊ शकणारे फडणवीस. असे कसे झाले? सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. अबब! असे कसे घडले? ज्या फडणवीसांनी सत्ता एकहाती खेचून आणली ते फडणवीस आता शिंदेच्या हाताखाली सरबराई करणार? बोलण्यात खत्रुड चेहऱ्याने हा माणूस खुनशी वाटतो तर बोलण्यात पिछवाड्यावर पेट्रोल टाकल्यावर जाळ लावला तर आगीच्या लोटात तोंडावाटे जो धूर निघेल तसला जळका बोलणारा आणि नशिबाने फुटका. कारण दोन वर्षे घरी बसला आता निवडून आला तर सत्ता गेलेली. अशा माणसाने म्हणजे खडसे महाशय लगेच खडखडले की फडणवीस हे शिंदे ह्यांच्या अधिपत्याखाली कामे करु शकतील का? उगीच कोणी विचारले नसताना आपल्या पिछवाड्याची आग तोंडातून ओकायची सवत मविआ आघाडीत बऱ्याच जणांना होती.
महाराष्ट्रात तसे बघितले तर स्थानिक दोन पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना. तर राष्ट्रीय स्तरावर दोन पक्ष भाजपा आणि कॉंग्रेस. म्हणजे राष्ट्रवादी कॉंग्रेस चा खरा प्रतिस्पर्धी शिवसेना आहे. आणि आपल्या प्रतिस्पर्धी पक्षाला संपवून म्हणजे शिवसेनेला संपवले तर आपली सरळ सरळ महाराष्ट्रात वर्णी लागेल ह्या दुर्दम्य लक्षाकडे शिवसेना संपविण्यासाठी घात लावून बसलेले शरद पवार. त्यांच्या एका मुलाखतीमध्ये त्यांनी ही बाब स्पष्ट केली होती की २०१४ मध्ये त्यांनी भाजपाला विनाशर्त पाठिंबा एवढ्यासाठी दिला की शिवसेना भाजपामध्ये फूट पडावी. आणि हिंदुत्वाचा अजेंडा मागे पडावा. त्यासाठी मग शरद पवारांचे शिवसेनेतील पित्तू ह्यांनी सत्तेत सहभाग असून भाजपा शिवसेना विरुद्ध रान उठविणे सुरू केले. आम्ही राजीनामा खिशात घेऊन फिरतो वगैरेची बाष्फळ मुक्ताफळं. पण हा एक प्रकारे ऊद्धव ठाकरेंच्या मनाची तयारी करण्याची प्रक्रिया सुरू होती.
संजय राऊत जे भाजपाला छोटा भाऊ म्हणायचे ते अगदी खरे आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पहिली युती ची निवडणूक लढली गेली ती १९९० साली जिथे भाजपाला ४२ जागा तर शिवसेनेला ५२ जागा मिळाल्या. १९९५ मध्ये भाजपाला कमी जागा म्हणून मुख्यमंत्री जोशी हे शिवसेनेचे बनले. भाजपा शिवसेना युती महाराष्ट्राचे एक पक्के समीकरण बनलेले ज्याला तोडणे आवश्यक होते. करिता संजय राऊतांना मध्ये आणले गेले.
२००९ साली शिवसेना कंट्रोल उद्धव ठाकरे ह्यांच्याकडे आले आणि शिवसेनेची पुरती पडझड सुरू झाली. २००९ साली छोटा भाई असणारा भाजपा – शिवसेनेपेक्षा १ मताने जास्त मतदार निवडून आणले आणि इथून शिवसेना पडझड सुरू झाली. एकतर ऊद्धव ठाकरे ह्यांना राजकीय परख नाही, दूरदृष्टी नाही, पक्षावर पकड नाही. हे सर्व गुण जर असते तर संजय राऊत सारख्या दुटप्पी माणसाला सल्लागार म्हणून कधीच् समोर येऊ दिले नसते. शिवसेना हा पक्ष हो! संपूर्ण पक्ष भावनात्मक रित्या जोडला गेलेला पक्ष आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ह्यांची जादू अशी की त्यांचा शब्द फिरविण्याची ताकद तत्कालीन भाजपा दिग्गज आडवाणी, वाजपेयी ह्यांच्यात देखील नव्हते. किंबहुना ही मंडळी बाळासाहेबांकडे येत सल्ला घेण्यासाठी, काही बाबतीत.
राकॉं मुख्यतः शिवसेना नेस्तनाबूत करण्यासाठी इतकी पुढे का सरसावली? कारण जर स्थानिक राजकारणातून शिवसेना पक्ष गेला तर एक मोठा पक्ष राजकारणातून बाहेर जाणार आणि राकॉं मग सरकार मध्ये सह पक्षाची भुमिकेत न राहता मेन स्ट्रीम मध्ये येणार. एवढी राजकारणातील दुरदृष्टी उद्धव ठाकरे कडे निश्चितच नाही.
२०१९ शिवसेना जिंकली ५६ जागा आणि शिवसेनेनी राकॉं ला हरविले २९ जागांवर तर राकॉं एकुण ५४ जागांवर विजयी झाले तर शिवसेनेला २८ जागा गमवाव्या लागल्या राकॉं समोर. हे राजकीय त्रैराशिक अति महत्वाचे आहे. जर शिवसेना कमजोर झाली आणि स्थानिक जागांवर लढण्याची ताकद गमावून बसली तर भाजपाला सामना कॉंग्रेस व राकॉं ह्या दोघांशी करावा लागेल. दुबळी शिवसेना अर्थातच् राकॉं कॉंग्रेस चा पल्लू पकडून भाजपा विरोधात लढणार. २०२४ ची निवडणूक भाजपा हारण्याचा पुरा पुरा बंदोबस्त शरद पवारांनी करून ठेवलेला. पाच जिल्ह्यांत राजकारण करणारा बारामतीदार एकदम महाराष्ट्र राजकारणात भाजपाचा सरळ सरळ प्रतिस्पर्धी म्हणून समोर येणार आणि भाजपाला पराभूत करणार ह्या शरद पवारांच्या खेळीला काटशह मिळाला.
शिंदेंना मुख्यमंत्री करण्याचे फायदे अनेक. एक तर भाजपाने दाखवून दिले की पदाची लालसा आम्हाला नाही. अडीच वर्षे अगोदर बंद आड चर्चा ५०-५० चे लांछन लावून जे विश्वासघाताचे राजकारण खेळले गेले त्या ऊद्धव ठाकरे च्या तोंडाला सरळ सरळ काळे फासले.
शिंदे मुख्यमंत्री म्हटल्यावर भविष्यात होणारी फाटाफूट टळली. शिवसेना नेतृत्व कोणाकडे? ऊद्धव कडे की शिंदे कडे? अर्थात शिवसेनेला आता निवडून येण्यासाठी फार मोठ्या चुनौती चा सामना करावा लागणार. पण शिवसेना नेस्तनाबूत होण्यापासून निश्चित वाचणार आणि परत उभारी ने राकॉं च्या विरोधात स्थानिक पक्ष म्हणून उभा ठाकणार. ही खरी दुखती रग आहे. शरद पवार शिवसेनेची नाळ तोडण्यात यशस्वी होणार होते तेवढ्यात ही खेळी भाजपाने खेळुन, शरद पवारांच्या मेहनतीवर पाणी फिरवले. महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागा आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस ला तोड म्हणून स्थानिक पातळीवर शिवसेना फार मोठे सहकार्य भाजपाला करू शकते आणि त्याला जिवंत ठेवण्याचे काम भाजपा ने केले.
शिंदे गटाची शिवसेना आता “शिवसेना”चे ओरिजनल टायटल सुद्धा आपल्याकडे मागू शकते आणि शिवसेना भवन वर पण आपला हक्क प्रस्थापित करु शकते आणि ऊद्धव ठाकरे आणि वंशावळ “शिवसेनेला” कायमची मुकु शकते. आणि जर पुढल्या निवडणुकीत भाजपा चा सहकारी म्हणून सरशी करायची असेल तर शिंदे गटाला “धनुष्यबाण” हे चुनाव चिन्ह आपल्याकडे घेतल्यास अधिक सोयिस्कर पडेल.
एकंदर शिंदे ह्यांना मुख्यमंत्री बनवून जो मास्टर स्ट्रोक मारला त्याला तोड नाही. शरद पवार ज्या गोष्टीची वाट बघत वयाची ८१ वी गाठली, आणि समेवर पोचले असताना मास्टर स्ट्रोकचा वज्राघात झाला नी शपथविधी झाल्यानंतर फक्त शरद पवारांनी पत्रकार परिषद बोलावली. बाकी शिवसेना, कॉंग्रेस ह्यांनी का नाही बोलाविली?‌ महाराष्ट्राच्या राजकारणातून एक मोठा पक्ष बाद करण्याची स्वप्ने राकॉं पहात होती. तो शिवसेना पक्ष राकॉं च्या पंखाखाली आपले अस्तित्व शोधू लागला. ही सर्वात मोठी चुक शिवसेना ने केली. तो पक्ष भाजपा ने परत जिवंत केला ही खंत उरी घेऊन. पत्रकार परिषदेचे प्रयोजन करण्यात आले. अर्थात ऊद्धव ठाकरेंनी त्यांना फोन केला ते पत्रकार परिषद घेत असतानाचे दरम्यान. पण गंमत पहा फोन लॅंडलाइनवर केला. मोबाईल वर नाही. म्हणजे ऊद्धव ठाकरे आता बऱ्यापैकी शरद पवारांच्या दूर झाले हा तर्कसंगत दृष्टिकोन.
बरे! पत्रकार परिषदेत शरद पवार युती तुटली त्याची कारणे वगैरे व्यवस्थित सांगितलीत का? त्यांचा पुर्ण ओघ आपल्या जुन्या कथा, तीच् ती ईडी ची सीडी ह्यावर जोर होता तर भाजपा ने सर्व बंडखोर दुसऱ्या राज्यात ठेवून यशस्वी बंड केले ह्याची खंत होती. बंडाला पैसा आला पण कुठून आला ? माहिती नाही. फडणवीसांचा पडलेला चेहरा दिसला त्यांना पण खरी खंत होती ती इतके राजकारण करुन ही शिवसेना ऊभी राहीली. फडणवीसांचा चेहरा पडणारंच्. कारण पात्र मुख्यमंत्री आजच्या घडीला फडणवीसच्. पण शरद पवारांना काटशह देण्यासाठी भाजपाचा हा मावळा देशहितासाठी एवढा मोठा त्याग केला. त्याला तोड नाही.
हेच् राजकारण अडीच वर्षापुर्वी खेळले गेले असते शिवसेना उप मुख्यमंत्री बनले असते तर मान सन्मान सहित आज ठाकरे परिवार एका वेगळ्याच उंचीवर राहिले असते. चिल्रछाप सल्लागार म्हणून तुम्ही जेव्हा सल्ले ऐकता आणि अपात्र सल्लागाराच्या डोस्क्यात सत्तेची गुर्मी असते असा सल्लागार हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या घराण्याची कशी वासलात लावू शकतो. ह्याचे ज्वलंत उदाहरण.
असे म्हणतात की ज्या उंचीवर राजकारण्यांचे विचार स्थिरावतात त्याच्यावर उपर मोदी – शहा जोडगोळी विचार करणे सुरू करते. हीच् जोडगोळी शरद पवारांचे पंतप्रधान बनण्याचे स्वप्न भंग करीत आहे तर महाराष्ट्रात शिवसेना संपविण्याचे स्वप्न भंग करीत आहेत.

भाई देवघरे

Leave a Reply