शासन निर्णयानंतर पर्यावरणवाद्यांची आरे साठी परत आंदोलनाची हाक

मुंबई : ३ जुलै – मुंबईतील मेट्रो कारशेड आरेतच बनवण्याचा निर्णय नवनिर्वाचित शिंदे सरकारनं घेतला आहे. या निर्णयाला पर्यावरणवाद्यांनी मोठा विरोध दर्शवला आहे. आज आरे जंगलातील मेट्रो कारशेडविरोधात पर्यावरणवाद्यांनी आंदोलनाची हाक दिली आहे. पर्यावरणवादी संघटनांनी रविवारी सकाळी सर्व पर्यावरणवादी आणि संघटनांना जमण्याचं आवाहन केलं आहे. आरे वनक्षेत्रात पर्यावरणवादी संघटनांकडून आंदोलन केलं जाणार आहे. पर्यावरणवाद्यांनी शांततापूर्ण आंदोलनाची हाक दिली आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.
महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने तत्कालीन मुख्यमंत्री आणि सध्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारचा मेट्रो कारशेडच्या स्थलांतराचा निर्णय बदलून कारशेड आरेतच करण्याचा निर्णय घेतला आहे.
आरे कारशेडविरोधात पर्यावरणवादी पुन्हा एकवटणार आहेत. पर्यावरणप्रेमींनी पुन्हा आंदोलनाची हाक दिली आहे. शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनीही आरेबाबतच्या निर्णयावर सरकारला पुन्हा एकदा विचार करण्याची विनंती केली आहे. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पूत्र अमित ठाकरे देखील आरे बचाव मोहमेसाठी मैदानात उतरले आहेत. ‘आरे’ कारशेडबाबत ‘नव्या उपमुख्यमंत्र्यांनी पुनर्विचार करावा’, अशी मागणी करणारी पोस्ट अमित ठाकरेंनी केली होती.
शिंदे सरकारनं आल्या आल्या ‘आरे’मध्येच मेट्रो कार शेड होणार असल्याचं राज्याच्या अॅडव्होकेट जनरल यांना कळवलं आहे. आरेमध्येच मेट्रो कारशेड बांधण्यात येईल, असे निर्देश महाराष्ट्र सरकारने राज्याच्या महाधिवक्ता यांना दिले आहेत. मेट्रो कारशेड हे आरेमधून कांजूरमार्गला नेण्याचा निर्णय ठाकरे सरकारनं घेतला होता. यावरुन मोठा गदारोळ देखील झाला होता. आरेमधील मेट्रो शेड विरोधात नागरिक देखील मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरले होते. त्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हे कारशेड कांजूरमार्गला नेण्याचा निर्णय घेतला होता.

Leave a Reply