मुलानेच केली बापाची हत्या

नागपूर : ३ जुलै – सिल्लेवाडा वेकोलि वसाहत परिसरात मोठय़ा आई-वडिलांसोबत मिळून सख्ख्या मुलानेच बापाची हत्या केल्याची घटना घडली. सदर घटना शनिवारी (२ जुलै) उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली. जगमोहन बनवरीलाल शाक्य (वय ५0) असे मृतकाचे नाव आहे.
खापरखेडा पोलिसांना मेयो रुग्णालयाच्या पोलिस चौकीकडून मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. लागलीच मिळालेल्या माहितीच्या आधारावर खापरखेडा पोलिसांनी सिल्लेवाडा येथील मृतकाच्या घरील घटनास्थळ गाठले. यावेळी आरोपींच्या घराला कुलूप लागले असल्याचे पाहिल्यावर खापरखेडा पोलिसांनी आरोपींना अण्णामोड येथून ताब्यात घेतले. आरोपींविरुद्ध कलम ३0२, ३४ अंतर्गत गुन्हा नोंद करून अटक केली.
मृतकासोबत त्यांची पत्नी आणि अपंग मुलगी सोबत राहत होती. मृतकाचा मोठा भाऊ ब्रिजमोहन बनवारीलाल शाक्य (वय ५४) व त्याची पत्नी दमयंती ब्रिजमोहन शाक्य (वय ४९) आणि मृतकाचा एकुलता एक अल्पवयीन मुलगा हे तिघेही जगमोहनच्या शेजारीच राहतात. ब्रिजमोहनला मूलबाळ नसल्याने जगमोहनचा अल्पवयीन मुलगा आरोपी ब्रिजमोहनकडेच लहानपणापासून राहायचा. काही दिवसांपासून ब्रिजमोहन आणि जगमोहन या दोन्ही भावांत संपत्तीवरून कौटुंबिक वाद सुरू होता.
या वादात दोघांच्याही पत्नी सहभागी होत्या. मंगळवारी सकाळी ७ वाजता जगमोहन यांनी ब्रिजमोहनला शिडी मागितली. यावरून दोघांमध्ये वाद होऊन विकोपाला जाऊन वादाचे हाणामारीपर्यंत पोहोचला. या वादात मृतकाच्या अल्पवयीन मुलानेसुद्धा ब्रिजमोहनकडून भाग घेत लाथा-बुक्क्य़ांनी सख्ख्या वडिलांना मारहाण केली असल्याची माहिती मिळाली.
मरणासन्न अवस्थेत जगमोहन बेशुद्ध अवस्थेत पाहून त्यांच्या पत्नीने शेजार्यांच्या मदतीने जगमोहनला प्राथमिक आरोग्य केंद्र चिंचोलीत आणले. जगमोहन गंभीर जखमी असल्याने त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून लागलीच नागपूर मेयो रुग्णालयात हलविण्यात आले होते. शनिवारी उपचारादरम्यान जगमोहन यांचा मृत्यू झाला.
आरोपी ब्रिजमोहन, आरोपी दमयंती आणि अल्पवयीन आरोपीस खापरखेडा पोलिसांनी अटक केली. घटनास्थळी डीवायएसपी मुख्तार बागवान यांनी पाहणी केली. घटनेचा तपास पोलिस निरीक्षक हृदयनाथ यादव करीत आहे.

Leave a Reply