मास्टर स्ट्रोकची हॅट्ट्रिक ! – विनोद देशमुख

शिवसेनेतील बंडखोरी 21 जूनला उघड झाल्यापासून, स्वत:ला पुरोगामी म्हणवून घेणाऱ्या लोकांकडून समाजमाध्यमांच्या काही समूहांवर देवेन्द्र फडणवीस यांच्यावर “लोण्याचा गोळा खाण्यास टपलेला बोका” अशी खालच्या पातळीवरची टीका सुरू झाली. त्या सर्वांची फार निराशा झाली असणार ! कारण, गेली अडीच वर्षे मांजर झालेला त्यांचा आवडता वाघ म्याऊ म्याऊ करत पळून गेला ! तोंडाने मर्द शब्दाचा उच्चार करत, विश्वासमताला सामोरे न जाण्याचा नामर्दपणा या कागदी वाघाने दाखवला !! (“ट्रस्ट व्होट फेस करायला हवे होते. पण ते लीडरशिप मध्ये कमी पडले” अशी प्रतिक्रिया लगेच व्यक्त करून काॅंग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीच उद्धव ठाकरे यांचे हे पितळ लगेच उघडे पाडले !) याउलट, कट्टर शिवसैनिक असलेले एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवून फडणवीसांनी मास्टर स्ट्रोक मारला आणि स्वत: उपमुख्यमंत्री बनून तर कमालच केली. या घडामोडीमुळे शिवसेनेसह इतर विरोधी पक्ष आणि समाजातील विरोधक नक्कीच चरफडले असणार !
महा विकास आघाडीचे सरकार पडले, हा उद्धव ठाकरेंचा पराभव कमी आणि या सरकारचा खरा रिमोट हाती असलेले शरद पवार यांचा पराभव जास्त आहे. उद्धव ठाकरे शिवसेनेचा रिमोट सोडून या फंदात पडले नसते तर दुसऱ्याच्या रिमोटवर नाचण्याची आणि शेवटी पळून जाण्याची पाळी त्यांच्यावर आली नसती. परंतु, शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवायचे आहे असे म्हणत म्हणत स्वत:च ती खुर्ची बळकावणे, हिंदुत्वविरोधक राष्ट्रवादी आणि काॅंग्रेस यांच्यासारख्या असंगांशी संग, ठाकरे असल्याचा अहंकार, घराणेशाहीपायी कट्टर शिवसैनिक असलेल्या नेत्यांकडे दुर्लक्ष आदी बाबींमुळे त्यांचे असे पतन झाले. हे खरे असले तरी, ते घडवून आणण्यात मोठा वाटा पवारांचाच होता. त्यामुळेच आताही ते उद्धव ठाकरे यांची जोमाने पाठराखण करताना दिसत आहेत. आक्रमक शिवसैनिकांमुळे बंडखोर आमदारांना धोका होऊ शकतो, हे जगजाहीर असताना, 2 हजार सीआरएफ जवान मुंबईत आणले गेले, असा अतार्किक आरोप करण्यापर्यंत पवार गेले.
अशा चलाख पवारांवर मात करीत देवेंद्र फडणवीसांनी 21 दिवसात 3 मास्टर स्ट्रोक ठोकले. 10 जूनला राज्यसभा निवडणूक, 20 जूनला विधान परिषद आणि 30 जूनला डबल मास्टर स्ट्रोक ! हे तडाखे इतक्या गुप्तपणे लगावले गेले की, स्वत: पवारही चकित झाले आणि त्यांनी फडणवीसांचे कौतुकही केले. देवेंद्र फडणवीस हेच या तीन आठवड्यांचे नायक ठरले. ते मान्य करणे अडचणीचे ठरत असल्यामुळे काही लोक उपमुख्यमंत्रिपदाच्या मुद्याला हवा देत आहेत. पण, हा मुद्दाच गैरलागू आहे. आणिबाणीत मुख्यमंत्री असलेले शंकरराव चव्हाण नंतर शरद पवारांच्याच बंडखोर सरकारमध्ये साधे मंत्री राहिले ! पुढे त्यांचेच पुत्र अशोक चव्हाण यांनीही मंत्री-मुख्यमंत्री-मंत्री असा प्रवास केला आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणेही विलासराव सरकारमध्ये मंत्री राहिले. त्यामुळे फडणवीसांनी वेगळे काहीतरी केले, असे भासविणे म्हणजे नव्या सरकारला अपशकुन करण्याचे प्रयत्न होय. पद कोणतेही असले तरी देवेंद्र फडणवीस हेच या महानाट्याचे खरे नायक आहेत, ही गोष्ट कोणीही विसरू नये.

विनोद देशमुख

Leave a Reply