उन्मादात गोळीबार करणाऱ्या वकील व त्याच्या तीन मित्रांवर गुन्हा दाखल

नागपूर : ३ जुलै – पार्टी केल्यानंतर उन्मादात विनाकारण गोळीबार करणारा वकील आणि त्याच्या तीन मित्रांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गिट्टीखदान पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली.
आलोक अरुणकुमार शुक्ला (वय ३९, रा. अशोकनगर), दीपक विद्यासागर चौधरी (वय ४५, रा. केटीनगर), राजू लक्ष्मण कडू (वय ४३, रा. रामनोहर विहार, हजारी पहाड) आणि कार्तिकेय नरेंद्र दशसहस्त्र (वय ३१, रा. रजत संकुल, गणेशपेठ) अशी या आरोपींची नावे आहेत. ही घटना गुरुवारी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास घडली. कडू वकील असून शुक्ला आणि दशसहस्त्र त्यांचे अशील आहेत. दीपक हा कडूचा मित्र आहे. या चौघांनी गुरुवारी रात्री पार्टी केली. त्यानंतर रात्री गाडीतून फिरत असताना चौघांपैकी एकाने उत्कर्षनगर चौक आणि त्यानंतर गोरेवाडा टोल नाका येथे हवेत प्रत्येकी एक राउंड फायर केला. हा गोळीबार शुक्लाच्या पिस्तुलातून झाला. त्याच्याकडे पिस्तूलचा परवाना आहे. दरम्यान, यामुळे नागरिकांत दहशत निर्माण झाली. घटनेची माहिती मिळताच गिट्टीखदान पोलिस सक्रिय झाले. त्यांनी चौघांना ताब्यात घेतले. मात्र, गोळ्या नेमक्या कोणी झाडल्या, हे अद्याप समोर आलेले नाही. पोलिसांनी गुन्हा दाखल करून चौघांना अटक केली. न्यायालयाने शुक्रवारी त्यांचा जामीन मान्य केला.

Leave a Reply