शिवसेना पक्षावर उद्धव ठाकरे यांचाच दावा मजबूत – उज्वल निकम

नागपूर : ३० जून – शिवसेना पक्ष नेमका कुणाचा? या प्रश्नाचे उत्तर उभ्या महाराष्ट्राला हवे आहे. हा पेच कायद्याच्या कचाट्यात अडकणार आहे, त्यामुळे यासंदर्भात ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांनी प्रकाश टाकला असून शिवसेना पक्षावर उद्धव ठाकरे यांचाच दावा मजबूत असल्याचे त्यांनी सांगितले. या शिवाय बंडखोर आमदार आपला गट दुसऱ्या पक्षात विलीन करतील ही देखील शक्यता फार कमी असल्याचे ते म्हणाले.
जवरच्या इतिहासातील सर्वात मोठ्या बंडाळीचा सामना शिवसेना पक्ष करत आहे. तब्बल 40 आमदारांनी बंडाचा झेंडा हाती घेतल्यामुळे उद्धव ठाकरे यांना नाईलाजाने मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले. त्यानंतर देखील अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत. त्यामध्ये शिवसेनेतील बंडाळीनंतर शिवसेना पक्ष कुणाचा? यावरून नवा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एकीकडे बंडखोर आमदारांच्या गटाकडे दोन तृतीयांश आमदार असल्याने आम्हीच बाळासाहेब ठाकरे यांचे खरे उत्तराधिकारी आहोत, असा दावा केला जात आहे. तर, दुसरीकडे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच शिवसेनेचे भविष्य असल्याचा दावा शिवसैनिकांनी केला आहे.
शिवसेनेसोबत बंड करून बाहेर पडलेल्या आमदारांना गट स्थापन करून एखाद्या राजकीय पक्षात विलीन व्हावे लागेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, यासंदर्भात ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम म्हणाले की, बंडखोर आमदारांना आपला गट कोणत्याही पक्षात विलीन करण्याची कुठलीही आवश्यकता नाही. ते शिवसेनेतून बाहेर गेले नाहीत.
महाविकास आघाडीकडे बहुमताचा आकडा नसल्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वतःहून पदावरून पायउतार झाले आहे. त्यामुळे, आता राज्यपाल २०१९ च्या निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भारतीय जनता पक्षाला सरकार स्थापन करण्याकरिता आमंत्रण देऊ शकतात. त्यानंतर भाजपला सुद्धा विधानभवनात बहुमत सिद्ध करावे लागेल. त्यानंतर नवीन सरकार खऱ्या अर्थाने अस्तित्वात येईल, असे देखील ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम म्हणाले.

Leave a Reply