पण ते शरद पवारांना सोडायला तयार नाहीत – गुलाबराव पाटील

गुवाहाटी : २९ जून – शिवसनेच्या बंडखोर आमदारांविरोधात बोलताना खासदार संजय राऊत यांनी वापरलेल्या वादग्रस्त विधानांबरोबरच आक्षेपार्ह भाषेवरुन एकनाथ शिंदेंसोबत असणाऱ्या बंडखोर आमदारांकडून निषेध व्यक्त केला जात आहे. अशातच बंडखोर आमदारांपैकी एक असणाऱ्या गुलाबराव पाटील यांनी राऊत यांना आम्ही शिवसेनेसाठी बरंच काम केलेलं आहे असं ऐकून दाखवतानाच शेलक्या शब्दांमध्ये राऊतांच्या टीकेचा समाचार घेतलाय. रेडिसन्स ब्लू हॉटेलमध्ये बंडखोर आमदारांसमोर गुलाबराव यांनी दिलेल्या एका छोट्या भाषणाचा व्हिडीओ जारी करण्यात आला आहे.
“आपण इथं कसे कसे आलो आहोत हे सांगण्याची गरज नाहीय. आपल्यावर जिल्ह्यामध्ये, मतदारसंघात आरोप प्रत्यारोप होतायत. पण ते होत असतानाच बऱ्याच पद्धतीने लोक सुद्धा आपल्या पाठीशी उभे राहत आहेत. दोन्ही प्रकार सुरु आहेत,” असं म्हणत गुलाबराव यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केल्याचं व्हिडीओत दिसत आहे. “आपल्यावर तर भरपूर टीका झालीय. पदं काढून घेऊ, तुमचे बाप किती… आता आमच्या जीवनाचा संघर्ष बोलणाऱ्यांना माहिती नाहीय,” असा टोला गुलाबराव यांनी लगावला आहे.
“१०० टक्के आपण शिवसेनाप्रमुखांच्या आशिर्वादाने या पदापर्यंत पोहचलो आहोत. पण आमची गोष्ट जर संजय राऊतांना सांगितली तर १९९२ च्या दंगलीमध्ये आम्ही तिघं भाऊ आणि बाप तुरुंगामध्ये होतो. त्यावेळेस संजय राऊत कुठे होते माहिती नाही. ५६ ब काय असतं हे संजय राऊतांना माहिती नाही. ३०२ काय असतं माहिती नाही. पण आम्ही ही सगळी भोगलेली आहेत,” असं गुलाबराव यांनी म्हटलंय. “तडीपार काय असतं हे त्यांना माहिती नाही, दंगलीच्या वेळेस पायी चालणं काय असतं हे त्यांना माहिती नाहीय,” असंही ते म्हणालेत.
“१०० टक्के त्यांच्या मागे वंदनीय शिवसेनाप्रमुखांचा आशिर्वाद आहे. पण हे केवळ बाळासाहेबांचा फोटो लावून मोठे झालेले आहेत. आपण बाळासाहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन क्रिया केलेले कार्यकर्ते आहोत. त्यामुळे २० टक्के स्वत:चा सहभाग आहे. ८० टक्के संघटनेची सोबत असली तरी २० टक्के आपली मेहनत आहे,” असं गुलाबराव यांनी आमदारांसमोर दिलेल्या भाषणात म्हटलंय.
“संजय राऊतांनी ४७ डिग्री तापमानात जळगावमध्ये येऊन ३५ लग्नं लावावित मी त्यांना बहाद्दर म्हणून समजून घेईन. त्या काळात आम्ही लग्न लावतो. ज्यावेळेस रात्री १२ वाजता रक्ताची गरज असते तेव्हा आमचा मोबाईल सुरु असतो, तो कधीच बंद नसतो. रुग्णवाहिका हवी? आम्ही असतो. कार्यकर्त्याचं लग्न असेल, दु:ख असेल, मरण असेल सगळीकडे आम्ही असतो. कार्यकर्त्यांमध्ये हा विश्वास आहे की आम्ही शिवसेना सोडणार नाही,” असं गुलाबराव यांनी कार्यकर्त्यासोबत असलेल्या नात्याबद्दल बोलताना म्हटलंय.
तसेच या भाषणामध्ये बंडखोर आमदारांचे प्रवक्ते असणाऱ्या दिपक केसकर यांच्या वक्तव्यांचाही उल्लेख गुलाबराव यांनी केलाय. “त्यातल्या त्यात केसरकर साहेब, तुम्ही जो बारीक डाल तडका देताय त्याचा फायदा झालेला आहे. त्यांना वाटू लागलंय की हे जे चाललंय ते बरोबर चाललंय,” असं गुलाबराव म्हणाले.
पुढे बोलताना गुलाबराव यांनी, “ज्यावेळेस मैदान येईल तेव्हा सभागृहामध्ये आपण जे ३९ आणि आपले १२-१४ अपक्ष मंडळी आहेत ऐवढेच पुरेसे आहेत त्यांना चर्चेमध्ये पराभूत करण्यासाठी. त्यांनी (मुख्यमंत्र्यांनी) वर्षा सोडला, आपल्यासारख्या ५२ आमदारांना सोडलं. पण ते शरद पवारांना सोडायला तयार नाहीत,” असा टोला मुख्यमंत्र्यांना लागवला आहे.
“आम्ही काहीच केलं नाहीय का त्यांच्यासाठी? आम्ही भरपूर केलेलं आहे. आमची परिस्थिती ज्यावेळेला नव्हती त्यावेळी काय काय केलंय हे आम्हाला माहितीय. हे जे मिळालंय ते निश्चितपणे त्यांच्या आशिर्वादने मिळालंय पण आमचाही त्यामध्ये काही त्याग आहे,” असंही गुलाबराव म्हणालेत. “आम्ही आमच्या घरी तुळशीपत्र ठेऊन काम केलेले लोक आहोत. त्यामुळे आयत्या बिळावर नागोबावाले नाही आहोत आम्ही,” असा टोला गुलाबराव यांनी संजय राऊतांना लगावला आहे.
चुना कसा लावतात माहिती नाही त्याला..
गुलाबराव पाटील यांना पुन्हा टपरीवर काम करावं लागेल अशी टीका राऊत यांनी केलेली. त्यावरुन त्यांनी या भाषणातून उत्तर दिलंय. “टपरीवर पुन्हा पाठवू संजय राऊत सांगतात. चुना कसा लावतात माहिती नाही त्याला अजून. वेळ येईल तेव्हा मी लावेल त्याला चूना. जाऊ द्या त्याच्यापर्यंत जाऊ द्या हे. आपल्याला एकत्रितपणे ही लढाई लढायची आहे,” असं गुलाबराव म्हणालेत.
भाषणाची शेवट गुलाबराव यांनी संजय राऊत यांना शेरो-शायरीमधून टोला लगावता केली. त्यांनी सादर केलेली शेरो-शायरी खालीलप्रमाणे…
आदमी टूट जाता हैं घर बनाने में
तुम तरस नहीं खाते बस्तियाँ जलाने में
कुछ लगता नाही दुश्मनी बढाने में
उम्र बीत जाती हैं दोस्ती निभाने में
दोस्तो रहने दो, छोडो दोस्ती निभाते क्यों हो
जवां हो कर तुम्हे भी डांस देगा वो राऊत
सांप के बच्चे को दूध पिलाते क्यों हो

Leave a Reply