क्षुल्लक वादातून पतीने केली पत्नीची हत्या

नागपूर : २९ जून – शहरातील सोनेगाव पोलिस ठाणे हद्दीत पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना पुढे आली आहे. दिवसाढवळय़ा ही हत्या करण्यात आली. पती-पत्नीमध्ये त्यांच्या मुलांच्या ताब्यावरून वाद होता. ते दोघेही वेगळे राहत होते. पत्नीचा मुलांना देण्यास नकार होता. अशातच पतीने पत्नीची हत्या केली. पत्नीच्या काही सहकार्यांनी यावेळी आरोपी पतीला पकडून थेट सोनेगाव पोलिस ठाण्यात आणले. त्यानंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करीत अटक केली आहे. शिवणगाव येथे मंगळवारी एका खासगी कंपनीच्या परिसरात ही घटना घडली. सचिन भगत असे आरोपी पतीचे नाव आहे.
या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, मृतका अंकिता भगत (वय २३, रा. शिवणगाव) ही येथील एका खासगी कंपनीमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून कामावर होती. आरोपी सचिन आणि अंकि ता हे दोघेही चंद्रपूर येथील निवासी आहेत. मागील जवळपास सात ते आठ वर्षांपूर्वी ते दोघेही घरातून पळाले आणि नंतर लग्न केले. सचिन हा वाहन चालक आहे. दरम्यान, सचिनला अंकिताच्या चरित्र्यावर संशय होता. यातूनच त्यांच्यात काही ना काही क्षुल्लक कारणांवरून वादविवाद होत होते. त्यांच्या भांडणाचे प्रकरण यापूर्वी देखील पोलिस ठाण्यात पोहोचले होते. परंतु, प्रकरण घरगुती भांडणाचे असल्यामुळे पोलिसांनी आवश्यक तेवढा हस्तक्षेप टाळला. परंतु, यातून त्यांच्यातील मनभेद अधिकच टोकाला गेले. भांडणामुळे ते दोघेही वेगळे-वेगळे राहत होते. आरोपी सचिनला त्याचे मुले श्लोक (वय ५) आणि श्रवण (वय ३) हे त्याच्या सोबत हवे होते. परंतु, यासाठी सचिनची पत्नी अंकिता ही तयार नव्हती. दरम्यान, सचिन आणि अंकितामध्ये यावरून नवा वाद सुरू झाला. अशातच मंगळवारी (ता. २८ जून) दुपारी सचिन हा अंकिता जिथे काम करते त्या ठिकाणी पोहोचला. या ठिकाणी देखील दोघांमध्ये चांगलाच वादविवाद झाला. भांडण आणि वाद टोकला पोहोचल्यानंतर रागाच्याभरात सचिनने त्याच्याजवळील चाकू काढला आणि अंकिताच्या पोटात आणि इतर ठिकाणी सपासप वार केले. चाकूचे वार होताच अंकिता जोराने आरडाओरड करू लागली. अंकिताची ओरड एकताच काही सहकर्मी हे कंपनीच्या बाहेर धावत आले. त्यांनी सचिनला पकडले. परंतु, सचिनच्या हल्ल्यात अंकिता ही गंभीर जखमी झाली होती. तिला मेडिकल येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले. तसेच पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. माहिती मिळताच सोनेगाव पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. परंतु, घटनास्थळीच अंकिताचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी आरोपी सचिन भगतविरुद्ध गुन्हा दाखल करीत अटक केली आहे.
दोन लहानग्या मुलांसमोर आरोपी सचिनने पत्नीच्या पोटात चाकू मारला. सचिनच्या दारू पिण्याने आणि तो कोणतेही काम न करत असल्याने अंकिता त्रस्त झाली होती. अंकिता ही शिवणगाव बसस्थानकाजवळ आपली ड्यूटी करीत होती. सचिन तेथे पोहोचला. त्याने अंकिताला सोबत येण्यास सांगितले. सचिनच्या छळामुळे हैराण झालेल्या अंकिताने सोबत येण्यास नकार दिला. दरम्यान, दोघांमध्ये वाद सुरू झाला. त्याने अंकितावर चाकूने हल्ला केला. पोटात वार झाल्याने अंकिता जागीच कोसळली. सचिन तेथून पळून गेला. घटनेच्या वेळी दोन्ही मुले तेथे होती. डोळ्यांसमोर वडिलांनीच आईची हत्या केल्याने अंकिताच्या दोन्ही मुलांना मोठा धक्का बसला आहे. तीन वर्षांच्या श्रवणला काहीच भान नाही. या घटनेनंतर आई-वडील नसल्यामुळे त्याचे रडणे थांबत नाही.

Leave a Reply