काय तमाशा… काय नेते… काय गनिमी कावा… – विनोद देशमुख

शेकापनेते स्व. गणपतराव देशमुख यांच्या विक्रमी आमदारकीमुळे गाजलेले सोलापूर जिल्ह्यातील सांगोला सध्या वेगळ्याच कारणाने गाजत आहे. बंडखोर शिवसेना आमदार शहाजी बापू पाटील यांच्या एका आॅडिओ क्लिपमुळं हे घडलं आणि त्यावरून तयार केल्या गेलेल्या गाण्यांचे व्हिडिओही धमाल करीत आहेत.
आमदार शहाजी बापू पाटील गुवाहाटीत आहेत. तेथून मोबाईलवर एका स्थानिक कार्यकर्त्याशी बोलताना ते म्हणाले- “काय झाडी, काय डोंगार, काय हाटेल, ओक्केमध्ये हाय…” हा संवाद सध्या महाराष्ट्रभर गाजत आहे. त्यावरून टिंगलटवाळीही सुरू आहे. या संवादावरून गाण्याचे व्हिडिओही बनवले गेले आणि तेही तुफान गाजत आहेत.
लोकांना वाटतं की, हा राजकीय तमाशाच आहे ! शिवसेनेचे दोनतृतीयांश पेक्षा जास्त, म्हणजे 55 पैकी 40 आमदार (70.9 टक्के) म्हणताहेत की, आम्हाला मविआ मध्ये काॅंग्रेस-राष्ट्रवादीसोबत राहायचे नाही. मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आघाडीतून बाहेर पडावं. हिंदुत्वाच्या मुद्यावरून नैसर्गिक मित्र असलेल्या भाजपाशी पुन्हा युती करून नवं सरकार स्थापन करावं. यावर शिवसेनेची भूमिका आहे की, बंडखोर आमदारांनी मुंबईत परत येऊन प्रत्यक्ष ठाकरेंसमोर आपली मागणी मांडावी. त्यावर योग्य तो निर्णय होईल.
आठवडा झाला, तिढा सुटत नाही. कारण, दोन्ही गट आपापल्या भूमिकेवर ठाम आहेत. आधी बाहेर पडा… आधी परत या… असा हा एकमेकांना जोखणारा, आव्हान देणारा, आवाहन करणारा संघर्ष आहे.
यात कळीचा मुद्दा हा दिसतो की, बंडखोर आमदार महाराष्ट्राबाहेर का गेले ? त्याचं काही अंशी उत्तर, शिवसैनिकांमध्ये नंतर उमटलेल्या पडसादामधून मिळतं. काही बंडखोर आमदारांच्या कार्यालयांवर हल्ले करून झालेली तोडफोड, काही सत्तारूढ नेत्यांची धमकीची भाषा हे पाहून बंडखोर आमदारांना महाराष्ट्रात सुरक्षित वाटत नसेल तर त्यांना दोष देता येईल का ? शिवसेनेची एकूण पृष्ठभूमी पाहता, असं होण्याची शक्यता लक्षात घेऊनच बंडखोर सुरत मार्गे गुवाहाटीला जाऊन पोहोचले, हे उघड आहे. यात महाराष्ट्राचा सन्मान झाला की अपमान झाला, ते प्रत्येकानं ठरवावं. पण, बलाढ्य शत्रूला गाफिल ठेवून गनिमी काव्यानं त्याला जेरीस आणायचं, हे छत्रपती शिवाजी महाराजांनीच आपल्याला शिकवलं आहे. त्याच तंत्राचा वापर बंडखोरांनी आणि त्यांना मदत करीत असलेल्या ‘महाशक्ती’नं केला असल्याचं जाणवतं. बंडखोरीसाठी का होईना, पण शिवसैनिकांनी गनिमी कावा वापरला, असं म्हणायला जागा आहे. मूळ शिवसेनाही हेच तंत्र वापरून बाजू उलटवते काय, ते दिसेलच.
एकूण काय, दावे-प्रतिदावे, आरोप-प्रत्यारोप, धमक्या, शिव्या, हिंसक आंदोलन यांचा एकच गदारोळ सध्या झालेला आहे. त्यात बंडखोर आमदारांची सुप्रीम कोर्टात याचिका आणि सरकारनं विश्वासमत घेण्याची भाजपाची राज्यपालांकडे मागणी, यांची भर पडून कायदेशीर लढाही सुरू झाला आहे.‌ या सर्व खटाटोपांची फलश्रुती राज्याला पुन्हा स्थिर सरकार लाभण्यात व्हावी, अशीच प्रार्थना विठुरायाला करू या ! हरी विठ्ठल !!

विनोद देशमुख

Leave a Reply