धमक्या अन् शिव्या… – विनोद देशमुख

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव येता येता आपल्या देशातील राजकारण अत्यंत खालच्या पातळीवर उतरले आहे. अनेक नेते एकमेकांना जाहीरपणे धमक्या देत आहेत, शिवीगाळ करू लागले आहेत. राजकीय जमातीचे हे वागणे लांच्छनास्पद आहे आणि हे पाहून नागरिकांना संताप येत आहे. यातून सामान्य माणसाने काय संंदेश घ्यायचा, असे लोक विचारू लागले आहेत. अशी काही ताजी उदाहरणे पाहा-
केंद्रीय मंत्री नारायण राणे : शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याची बंडखोर आमदारांना धमकी. आमदारांच्या अंगाला हात जरी लागला तरी घर गाठणे कठीण होईल.
(पवारांच्या विधानावर प्रतिक्रिया व्यक्त करताना केलेले हे ट्विट अयोग्यच. स्वत:चे मंत्रिपद, पवारांची ज्येष्ठता यांचा विचार राणे यांनी करायला हवा. राजकारण करताना संयम बाळगलाच पाहिजे.)
ज्येष्ठ नेते शरद पवार : आसामला गेलेल्या आमदारांना मुंबईत यावेच लागेल. विधानभवनाच्या प्रांगणात गुजरात-आसामचे नेते त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी येणार नाहीत.
(बंडखोर आमदारांना अप्रत्यक्ष धमकीच. पन्नास वर्षांची प्रदीर्घ राजकीय कारकीर्द असलेल्या पवारांकडून असे काही अपेक्षित नाही. तेही जाहीर पत्रपरिषदेत.)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे : हिंमत असेल तर बाळासाहेबांचे नाव न घेता स्वत:च्या बापाच्या नावाने मते मागा !
(बाळासाहेब ठाकरे हे हिंदू समाजाचे, मराठी माणसाचे सार्वत्रिक बाप आहेत. त्यांचा काॅपीराईट होऊ शकत नाही.)
युवासेना नेते आदित्य ठाकरे : विमानतळ ते विधानभवन हा रस्ता वरळीतूनच जातो.
(आदित्य वरळीचे आमदार आहेत आणि बंडखोरांना महाराष्ट्रात परतल्यावर याच मार्गाने मुंबईत शिरावे लागेल. हे लक्षात घेतले म्हणजे वरील वाक्याचा इशारा सहज कळतो.)
शिवसेना प्रवक्ते संजय राऊत : बंडखोरांसाठी शिवसेनेचे दरवाजे बंद. गरज असेल तर रस्त्यावरही संघर्ष करू.
(बंडखोरांना हिंसक धमकी, शिवसैनिकांना अप्रत्यक्ष चिथावणी, महाराष्ट्रभर पडसाद उमटले.)
गेल्या 4-5 महिन्यांपासून संजय राऊत यांनी धमक्या आणि शिवीगाळ यांचा सपाटाच लावला आहे. ताज्या राज्यसभा निवडणुकीनंतर त्यांनी, शिवसेना उमेदवाराला मत न देणाऱ्या 6 अपक्ष आमदारांची नावे घेऊन त्यांना “पाहून घेऊ” म्हटले ! विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस नागपुरात परत कसे जातात, असेही ते एकदा बोलून गेले. विरोधकांसाठी 20 फूट खोल खड्डा खोदण्याचीही गोष्ट त्यांनी केली.‌
थेट प्रक्षेपण होत असलेल्या पत्रपरिषदेत शिव्या उच्चारण्याचा विक्रमही राऊतांनी नोंदविला. काल रविवारी मुंबईच्या दहिसर भागातील सभेत राऊत म्हणाले- कामाख्या मंदिरासाठी 40 रेडे पाठविले आहे. त्यांचा बळी द्या ! गुवाहाटीहून 40 आमदारांच्या बाॅड्या येतील. त्यांना थेट पोस्टमार्टमसाठी पाठवू ! एका बापाचे असाल तर राजीनामे देऊन निवडणुकीला सामोरे जा.
(आपण मराठी भाषेतील संपादक/पत्रकार आहोत, याचे भान बाळगायचेच नाही, असे त्यांनी ठरविलेले दिसते.)
भाजपानेते किरीट सोमय्या : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे माफिया सरदार, हायकोर्टाने पुन्हा थोबाडीत मारली वगैरे.
(मनाला येईल ते बोलत सुटण्याची ही सवय चुकीची.)
अशी बेताल वक्तव्ये दिवसेंदिवस वाढत आहेत आणि त्यामुळे समाजात तणाव वाढू शकतो, हा धोका आमच्या राजकीय नेत्यांना दिसत नाही का ? की, सारे धृतराष्ट्रासारखे स्वार्थांध झाले आहेत !

विनोद देशमुख

Leave a Reply