ताजा कलम – ल.त्र्यं.जोशी

महत्वाच्या टप्प्यावर एकनाथ शिंदे यांचा विजय

उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील मविआ सरकारच्या विरोधात बहुसंख्य शिवसेना आमदारांनी उठविलेला दमदार आवाज अतिशय महत्वपूर्ण टप्प्यावर पोचला असतानाच एकनाथ शिंदे यांच्या गटाला सोमवारी सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाल्याचे जरी सांगितले जात असले तरी हा त्या गटाचा मोठा विजय म्हणावा लागेल. विधानसभा उपाध्यक्षांनी शिंदे यांच्यासह सोना आमदारांच्या निलंबनासाठी जारी केलेल्या नोटिसांची अंमलबजावणी बारा जुलैपर्यंत तहकूब होणे यापुरतेच या विषयाचे महत्व नसून या प्रकरणात शिवसेनेचे सेनाप्रमुखांच्या थाटात दिमाखात वावरणारे स्वनामधन्य प्रवक्ते संजय राऊत यांनी निर्माण केलेल्या नॅरेटीवलाच आडवे करून टाकले आहे. त्यातच शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी आपल्या ब्लाॅगमधून शिंदे यांच्या खर्या भूमिकेला नव्या वातावरणात उजाळा दिल्याने मविआचे अवसान गळाले असेल तर तो शिंदे यांच्यासाठी बोनसच असेल.
आतापर्यंत संजय राऊत शिंदे यांच्या भूमिकेला ते सत्तेसाठी हे सगळे करीत असल्याचा व शिवसेनेशी गद्दारी करीत असल्याचा आयाम देत असल्याने शिंदेगटाला बचावाची भूमिका घ्यावी लागत होती. पण ही केवळ आजच्या सत्तेसाठीची लढाई नसून 2024 साठीची लढाई आहे, हा नॅरेटीव पुढे रेटण्यातही केसरकरांच्या ब्लाॅगमुळे शिंदे गटाला यश मिळाले आहे. 2024 च्या विधानसभा निवडणुकी आपण भाजपा आणि मोदींशिवाय लढलो तर काय अवस्था होऊ शकते आणि तोपर्यंत राष्ट्रवादी आपल्याला कशी गिळंकृत करू शकते, हे केसरकर यांनी अतिशय कौशल्याने निवसैनिकांच्या लक्षात आणून देऊन संजय राऊत यांनी आक्रस्ताळेपणाने उभा केलेला नॅरेटीव उध्वस्त करून टाकला.
त्यातच सोमवारच्या दिवसभरात शिंदे अशा काही खेळी खेळले की, त्यांचे मास्टरस्ट्रोक असेच वर्णन करावे लागेल.
रविवारी सायंकाळपासून घडलेली एकेक घटना पाहा म्हणजे शिंदे यांच्या या खेळींचे महत्व अधोरेखित होईल.या प्रकरणात बंडखोरी थांबली असे वातावरण निर्माण होत असतानाच उच्चशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी गुवाहाटी गाठणे हा सत्तारूढ गटासाठी एक थक्काच होता.प्रारंभी उदय सामंत यांच्या कृतीबद्दल शंका वाटत होती.काही मंडळीनी उध्दवजींचे हेर असे त्यांचे वर्णन करण्याचा प्रयत्न केला पण शिंदे यांनी सामंत यांचे मनापासून स्वागत केल्याच्या चित्रफितीनी लोकांचा परस्परच भ्रमनिरास झाला. पाठोपाठ आपला पक्ष हा खरा शिवसेना पक्ष असल्याचा दावा अधिकृत स्वरूपात करून आपल्या विरोधकांची झोप उडवून दिली.
त्यानंतरचा खरा मास्टरस्ट्रोक सोमवारी लगावला. आपल्या गटातील शिवसेनेच्या बहुसंख्य आमदारांनी उध्दव सरकारचा पाठिंबा काढून घेतला आहे, ही बाब त्यानी योजनापूर्वक सर्वोच्च न्यायालयातील याचिकेवर सुनावणी होईपर्यंत अधोरेखित केली नाही.प्रथम ती याचिकेतून समोर आली आणि याचिकेवरील सुनावणी पूर्ण होण्यापूर्वीच राज्यपालांना पाठिंबा काढल्याचे रीतसर पत्र देऊन उध्दव गटाला जोरदार धक्का दिला. याला मास्टरस्ट्रोक यासाठी म्हणायचे की, आपली सर्वांची आमदारकी शाबूत असताना आपण पाठिंबा काढून घेतला हे सिध्द व्हावे.उपाध्यक्षानी आमदारांवर कारवाई करण्यापूर्वीच हे घडण्याला एक वेगळे महत्व आहे. म्हणून त्याला मास्टर स्ट्रोक म्हणायचे.
सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे उध्दव ठाकरे यांच्या वकिलानी शेवटचा प्रयत्न म्हणून संभाव्य अविश्वास वा विश्वास प्रस्ताव विधानसभेत येण्याचा मार्ग रोखण्याची प्रयत्न केला पण न्यायालयाने तो साफ फेटाळून लावला.
आधीच्या बातमीनुसार एकनाथ शिंदे सोमवारी सायंकाळी केंद्रीय सुरक्षा दलाच्या संरक्षणात मुंबईत येऊन राज्यपालांना भेटणार होते पण सायंकाळी सहापर्यंत तरी त्याबाबतची बातमी नव्हती.कदाचित सर्वोच्च न्यायालयातील घडामोडींमुळे त्याना हे पाऊल उचलण्याची गरज वाटली नसावी.आता त्यांच्या पुढील खेळीची आपल्याला वाट पाहावी लागेल.दरम्यान भाजपाच्या कोअर कमेटीची आज दिवसभर फडणवीस यांच्या निवासस्थानी बैठक सुरू होती व सायंकाळी त्याबाबतची पक्षाची वेट अॅड वाॅचची भूमिका कायम असल्याचा निर्वाळा दिला.
सोमवारची आणखी एक उल्लेखनीय घटना म्हणजे सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असतानाच संजय राऊत याना इडीची नोटिस गेल्याची वार्ता आली.स्वतः राऊतानीही तिला दुजोरा दिला पण तो देताना दिसणारी राऊतांची देहबोली ते घाबरले असल्याचाच संकेत देत होती.त्याना कुणीही गुवाहाटीला बोलावले नसताना ‘ मान कापली तरी गुवाहाटीला जाणार नाही ‘ असे उद्गार काढून त्यानी आपली मनस्थिति दाखवून दिली.

ल.त्र्यं.जोशी
ज्येष्ठ पत्रकार नागपूर

Leave a Reply