अमेरिकेत एका ट्रकमध्ये आढळले ४० पेक्षा अधिक मृतदेह

नवी दिल्ली : २८ जून – मागील काही दिवसांपासून अमेरिकेमध्ये शाळा तसेच सार्वजनिक ठिकाणी गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत. या गोळीबारामध्ये आतापर्यंत अनेकांचा मृत्यू झाला आहे. असे असतानाच आता अमेरिकेतील टेक्सासमध्ये हादरवून टाकणारी घटना घडली आहे. येथील सॅन अंटोनिओ या भागात एका ट्रकमध्ये ४० पेक्षा जास्त मृतदेह सापडले आहेत. या मृत व्यक्तींची अद्याप ओळख पटलेली नसून पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
टेक्सासमधील केएसएटी या वृत्तवाहिनीने याबाबत सविस्तर वृत्त दिले आहे. या वृत्तानुसार सॅन अंटोनिओ शहरातील दक्षिणेकडे एका रेल्वे रुळाच्या बाजूला ट्रकमध्ये एकूण ४२ मृतदेह सापडले आहेत. याबाबत स्थानिक पोलिसांना विचारले असता त्यांनी यावर कोणतेही भाष्य केले नाही.
केएसएटी या वृत्तावाहिनीच्या पत्रकाराने या घटनेचे काही फोटो आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये मोठ्या ट्रकच्या बाजूला काही रुग्णवाहिका तसेच पोलिसांच्या गाड्या दिसत आहेत. मात्र एकाच वेळी तब्बल ४२ जणांचा मृत्यू झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. या लोकांचा मृत्यू का झाला? हा नैसर्गिक मृत्य आहे की हत्या? हे स्पष्ट झाले नसून टेक्सास आणि सॅन अंटानिओ पोलीस अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply