अग्निपथ विरोधात काँग्रेस आक्रमक, नागपुरात अडवली रेल्वे

नागपूर : २८ जून – सैन्यभरतीसाठी केंद्र सरकारने आणलेल्या अग्निपथ योजनेविरोधात नागपुरात युवा काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. केंद्र सरकार देशातील तरुणांना देशोधडीला लावण्याचे काम करीत असून, लष्करात कंत्राटी पद्धतीने भरती करण्याचा सरकारचा निर्णय चुकीचा असल्याचे सांगत युवक काँग्रेसने विरोध नोंदविला आहे. तसेच या योजनेचा विरोध करण्यासाठी नागपूर येथे या संतप्त कार्यकर्त्यांनी नागपूर-गोंदिया रेल्वे अडविली. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ही अग्निपथ योजना तत्काळ रद्द करण्याची मागणी यावेळी कार्यकर्त्यांनी केली.
नागपुरात युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस बंटी शेळके यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी अजनी रेल्वे स्थानकावर हे रेल रोको आंदोलन केले. संतप्त कार्यकर्त्यांनी केंद्रातील मोदी सरकारच्या ध्येय धोरणावर टीका करून अग्निपथ योजनेविरोधात नारेबाजी केली. अजनी रेल्वे स्थानकावरून गोंदियाकडे जाणारी ही ट्रेन आंदोलनकर्त्यांनी अडवली. जवळपास अर्धा तास ही ट्रेन त्यांनी अडवून ठेवली होती. सरकार जोपयर्ंत आमच्या मागणीची दखल घेत नाही, तोपयर्ंत आम्ही येथून हलणार नाही, येथेच बसून राहू, अशी भूमिका या कार्यकर्त्यांनी घेतली होती. दरम्यान, पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना समजविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहता पोलिसांनी बळाचा वापर करून त्यांना रेल्वे रुळावरून हटविले व रेल्वेचा मार्ग मोकळा करून दिला.

Leave a Reply