संपादकीय संवाद – उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देणेच उचित ठरेल

गत ७ दिवसांत महाराष्ट्राच्या राजकारणात जे काही घडते आहे, ते बघता शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री उद्धवपंत ठाकरे यांनी प्रतिष्ठेचा प्रश्न न करता, राजीनामा देऊन बाजूला होणे हेच श्रेयस्कर ठरते. उभयपक्षी प्रश्न प्रतिष्ठेचा केल्यामुळे गेल्या आठवडाभरापासून महाराष्ट्राचे प्रशासन जवळजवळ ठप्प झाले आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. मात्र असे न करता संजय राऊत आणि उद्धव ठाकरे हे दोघेही आरोप प्रत्यारोप करण्यातच धन्यता म्हणतांना दिसत आहेत, त्यामुळे प्रकरण जास्त चिघळते आहे, असे जनसामान्यांची धारणा होते आहे.
गेल्या आठवड्यात जे सुरु झाले ते कधीतरी होणार हे ज्या दिवशी महाआघाडी सरकार गठीत झाले, त्याचदिवशी निश्चित झाले होते. मात्र तरीही उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात हे सरकार ५ वर्ष पूर्ण करणार आणि नंतरही अजून पाच वेळा ठाकरे मुख्यमंत्री होणार अश्या वलग्न केल्या जात होत्या. विरोधकांना संपवण्याची भाषा बोलली जात होती, त्याचवेळी आपल्याच घरात काय जळते आहे, हे बघितले जात नव्हते. त्यामुळे आजची ही परिस्थिती निर्माण झाली, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.
राज्यातील महाआघाडी सरकार हेच अनैतिकतेच्या आधारावर गठीत झाले होते, या सरकारला जनमताचा कौल नव्हता, यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांना जनतेने विरोधात बसण्यासाठी जनादेश दिला होता, त्याचवेळी शिवसेनेला भारतीय जनता पक्षाबरोबर सत्ता स्थापन करण्यासाठी जनमताने आदेश दिला होता. मात्र हा आदेश झुगारत सत्तेसाठी शिवसेनेने ही तडजोड केली, त्यामुळे मुख्यमंत्री बनण्याचे उद्धव ठाकरेंचे स्वप्न जरूर साकार झाले, मात्र शिवसेनेतील सामान्य कार्यकर्ते आणि शिवसेनेला चाहणारे त्यांचे हितचिंतक दुखावले, भाजपबरोबर सत्ता स्थापन करणार असे सांगून निवडून आलेले शिवसेनेचे आमदार जेव्हा जनतेकडे जाऊ लागले, तेव्हा जनतेच्या प्रश्नांना उत्तरे देणे त्यांना अडचणीचे जाऊ लागले.
त्यातच हे तीन पक्षांचे सरकार होते, त्यात राष्ट्रवादी काँग्रेसची दादागिरी होती, सर्व सत्तासूत्रे त्यांच्या हातात होती, त्यामुळे शिवसेनेचा मुख्यमंत्री असूनही शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींना आपल्या मतदारसंघात कामे करण्यासाठी काहीही निधी मिळे ना परिणामी नाराजी वाढू लागली, आणि २० जून रोजी असंतोषाचा भडका उडाला आता हा असंतोष शमवणे कठीण झाले आहे, सुरुवातीला १३ आमदार बंडखोरी करत आहेत असे बोलले गेले होते, मात्र वाढत वाढत हा आकडा आज ४० वर गेलेला आहे. ५५ आमदार असलेल्या शिवसेनेकडे आता जेमतेम १५ आमदार उरले आहेत. ही चिंतेचीच बाब आहे,
आज शिवसेना नेते वेगवेगळे दवे करत आहेत, या आमदारांना बळजबरीने नेले असल्याचे ते सांगत आहेत, मात्र तसे झाले असते असते तर एव्हाना आमदारांनी ओरड सुरु केली असती, आज ते आमदार इथे खुशीत आहेत, हे बघता आमदारांना बळजबरीने पळवून नेले ही ओरड निरर्र्थक ठरते. आमदार तक्रारी मांडत असल्याच्या चित्रफितीही समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहेत, हे बघता शिवसेनेची ओरड निरर्थक आहे,शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भावनिक आवाहन जरूर केले मात्र त्यानेही काही साधले नाही.
हे सर्व बघता उद्धव ठाकरे यांनी प्रतिष्ठेचा प्रश्न न करता मुख्यमंत्री पदाचा आणि सरकारचा राजीनामा देणेच उचित ठरते, त्याचबरोबर जर बहुसंख्य आमदारांची इच्छा असेल तर हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन त्यांनी कुणाबरोबर सरकार बनवावे यासाठीही मोकळीक देणें हेच उचित ठरते, त्यासाठी उद्धवपंतांनी वेळीच पाऊले उचलावी इतकेच याठिकाणी सुचवावेसे वाटते.

अविनाश पाठक

Leave a Reply