शरद पवारांच्या सांगण्यावरूनच संजय राऊत शिवसेना संपवत आहेत – दीपक केसरकर

गुवाहाटी : २७ जून – राज्यामध्ये सुरु असणाऱ्या सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर आता बंडखोर आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सांगण्यावरुन शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत हे शिवसेना पक्ष संपवत असल्याचा आरोप केलाय. सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विरुद्ध बंडखोर आमदार अशी न्यायलायीन लढाई सुरु असतानाच बंडखोर आमदारांनी उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय असणाऱ्या राऊत यांना लक्ष्य केलं आहे.
बंडखोर आमदारांचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी आमदांरांच्यावतीने बोलताना संजय राऊतांवर गंभीर आरोप केले आहे. “संजय राऊत हे शरद पवारांच्या आदेशानुसार पक्ष (शिवसेना) संपवण्याचा प्रयत्न करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय राऊतांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन गोळ्या चालवतील,” असं केसकर यांनी म्हटलं आहे.
मात्र पुढे बोलताना केसकर यांनी बंडखोर आमदार संघर्ष सुरु ठेवणार असल्याचंही नमूद केलंय. “आम्ही संपणार नाही. आम्ही थांबणार नाही. आम्ही माघार घेणार नाही जोपर्यंत आम्ही महाराष्ट्राला नवीन उंचीवर नेवून ठेवत नाही,” असं केसकर यांनी म्हटल्याचं वृत्तसंस्थेनं म्हटलंय.
अन्य एका मुलाखतीमध्येही केसकर यांनी राऊतांवर कठोर शब्दांमध्ये टीका केलीय. संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांवर खालच्या भाषेत टीका करताना आमदारांनी मुंबईत येऊन दाखवावे असे आव्हान दिले आहे. त्यानंतर गुवाहाटी येथे मुक्कामी असलेले बंडखोर आमदार देखील संतापले आहेत. बंडखोर आमदारांच्यावतीने बोलताना दीपक केसरकर यांनी राऊतांसह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना चांगलंच सुनावलं आहे. “मी आतापर्यंत शांत राहिलो. संजय राऊतांना आम्हीच मतं दिली. अगोदर त्यांनी राज्यसभेचा राजीनामा द्यावा आणि नंतर ही वक्तव्ये करावी. ही वक्तव्ये कोण सहन करणार आहे?” असा सवाल केसरकर यांनी उपस्थित केलाय.

Leave a Reply