मंत्रिमंडळातील खात्यांचे फेरवाटप, आदित्य ठाकरेंकडे अतिरिक्त खात्याचा कार्यभार

मुंबई : २७ जून – राज्यामध्ये सध्या सुरु असणाऱ्या सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी एक मोठा निर्णय घेत आपल्या मंत्रीमंडळातील बंडखोर मंत्री आणि राज्यमंत्र्यांच्या खात्यांचं फेरवाट केलं आहे. बंडखोर आमदारांचे नेतृत्व करणाऱ्या एकनाथ शिंदेंकडून नगरविकास खातं काढून घेण्याबरोबरच उद्धव ठाकरेंनी त्यांचे पुत्र आणि निवडून आलेल्या शिवसेना आमदारांपैकी सध्या शिवसेनेसोबत असलेले एकमेव मंत्री असणाऱ्या आदित्य ठाकरेंकडे अधिक एका खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
जनहिताची कामे अडकून न राहता ती अविरतपणे सुरू राहण्यासाठी ठाकरे सरकारने हा निर्णय घेतल्याचं स्पष्ट केलं आहे. सध्या सुरू असलेल्या पावसाळ्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता लक्षात घेता आपत्तीच्या घटनांचा विचार करता महत्वाच्या विभागांची कामे सुरळीतपणे पार पाडण्यासाठी तातडीने खात्यांचं फेरवाटप करण्यात आल्याचं सरकारने सांगितलं आहे. सध्या बंडाळीमुळे अनुपस्थित असणारे पाच मंत्री आणि चार राज्यमंत्री यांच्याकडील खाती इतर मंत्र्यांना सोपविण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. या फेरवाटपामध्ये आधीपासूनच पर्यटन आणि पर्यावरण मंत्रालयाचा कारभार संभाळणाऱ्या आदित्य ठाकरेंना अधिक एक खातं देण्यात आलं आहे.
उदय सामंत यांच्याकडील उच्च व तंत्र शिक्षण खाते आदित्य ठाकरे यांच्याकडे सोपवण्यात आलं आहे. सध्या सोशल मीडियावर परिक्षांच्या पार्श्वभूमीवर उच्च व तंत्र शिक्षण खातं सर्वाधिक चर्चेत असल्याचं चित्र दिसत आहे. शिवसेनेतील आमदारांची गळती रविवारीही कायम असल्याचं दिसून आलं. गेले चार दिवस तळ्यात-मळ्यात करणारे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत हे रविवारी गुवाहाटीमध्ये शिंदे गटात सहभागी झाले. त्यामुळे शिंदे यांना साथ देणाऱ्या शिवसेना आमदारांची संख्या ३९ झाली आहे.
आदित्य ठाकरे, सुभाष देसाई आणि अनिल परब हे तीनच मंत्री आता शिवसेनेत आहेत. उर्वरित सर्व मंत्र्यांनी गुवाहाटी गाठले आहे. त्यामुळेच आता मंत्रीमंडळामध्ये फेरबदल करुन मंत्रीपदांचं आणि खात्यांचं फेरवाटप करण्यात आलं आहे.

Leave a Reply