ताजा कलम – ल.त्र्यं.जोशी

रस्त्यावरचे शक्तिप्रदर्शन किती साधक किती बाधक?

शिवसेना विधिमंडळ पक्षातील सुमारे पंचेचाळीस ते पन्नास आमदारांच्या बंडखोरीमुळे राज्यात निर्माण झालेला पेचप्रसंग विधानभवन किंवा सर्वोच्च न्यायालय या दोन ठिकाणीच सुटणार, ही बाब अतिशय स्पष्ट असताना शिवसेनेच्या वतीने हल्ली ठिकठिकाणी रस्त्यावर येऊन केल्या जाणार्या हिंसक शक्तिप्रदर्शनाला काय अर्थ उरतो, हे शक्तिप्रदर्शन कितपत साधक व कितपत बाधक आहे हा प्रश्न निर्माण होतो.दरम्यान बंडखोर आमदारांचे समर्थकही काही प्रमाणात रस्त्यावर उतरून आपल्या आमदारांचे समर्थन करू लागल्याने निर्माण होणारी कायदा सुव्यवस्था स्थिती हा वेगळाच प्रश्न निर्माण होत आहे.त्यातच आता बंडखोर आमदारांच्या संरक्षणासाठी केंद्रीय राखीव पोलिस दलही उतरले आहे. हा एक नवा आयाम या प्रकरणाचा प्राप्त झाला आहे कोण व किती आमदार नेमके कुणाच्या बाजूने आहेत, हे अंतिमतः स्पष्ट व्हायला आणखी काही कालावधी लागणार असला तरी बहुसंख्य शिवसेना आमदार शिंदे यांच्यासोबत आहेत हे एव्हाना स्पष्ट झाल्याने सेनेला आपल्या समर्थकांचे मनोबल वाढविण्यासाठी या आक्रमकतेचा उपयोग होणे स्वाभाविकच आहे.पोलिसांची या हिंसाचाराकडे पाहण्याच्या अलिप्त वृत्तीचीही त्यात भर पडली होती.त्यामुळे निदर्शक अधिक आक्रमक होत होते.पण आता परिस्थिती बदलली आहे.एक तर स्वतः राज्यपालांनी पोलिसांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत आणि बंडखोर आमदारांचे समर्थकही प्रतिकारास सज्ज झाले आहेत.शिवाय रस्त्यावरच्या लढाईच महत्व निर्णायक ठरू शकत नाही.त्यामुळे उद्या या लढाईचे स्वरूप कोणता आकार घेते याबद्दल उत्सुकता निर्माण होणे स्वाभाविक आहे.
रविवारची एक लक्षणीय घटना म्हणजे बंडखोरांवर प्रचंड दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न संजय राऊत व आदित्य ठाकरे यांच्याकडून सुरू असताना ठाकरे सरकारमधील एक मंत्री उदय सामंत आज बंडखोरांच्या तंबूत गुवाहाटीला जाऊन पोचल्याने खळबळ उडाली आहे.सामंत यांना तिकडे जायचेच होते तर ते आधी तिकडे का गेले नाहीत आणि आज गेले ते एकटेच का गेले, असे या प्रश्नाचे शंकायुक्त स्वरूप आहे.पण आतापर्यंतच्या घटनांवरून तरी एकनाथ शिंदे यांचाच परिस्थितीवर वरचष्मा असल्याने व आपल्या भूमिकेवर ते ठाम असल्याने ते शिवसेनेला हेरगिरीची संधी देतील हे शक्य वाटत नाही.सामंत याना गुवाहाटीत पोचू देण्यापूर्वी त्यानीही आवश्यक ती शहानिशा केली असली पाहिजे, हे मानायला कुणाची हरकत नसावी.
रविवारच्या घटनांमधून या प्रकरणातील आणखी एक पैलू समोर आला आहे.शिवसेनेतील या बंडाळीच्या अनेक कारणांपैकी एक कारण म्हणजे संजय राऊत यांची आक्रस्ताळी देहबोली हे आहे, हे शिवसैनिक कदाचित मान्य करणार नाहीत पण याबाबत सेनेबाहेरील तिच्या समर्थकांचे मात्र एकमत होईल.कारण सामना या मुखपत्राचे कार्यकारी संपादक व राज्यसभा सदस्य असलेले राऊत अक्षरशः काहीही बोलत असतात. कुणाचाही बाप काढण्याचे तर त्यांना जणू व्यसनच जडले आहे. त्यामागे फक्त आणि फक्त आक्रमणच असते.शुचितेचा,सभ्यतेचा, संयमाचा त्यांच्या शब्दाना साधा स्पर्शही नसतो.अन्यथा बंडखोर आमदार एकापेक्षा अनेक बापांची लेकरे आहेत, अशी मुक्ताफळे त्यानी उधळली नसती.या शैलीने त्यांच्या पक्षप्रमुखाचा काय फायदा होतो हे ठाऊक नाही पण नजिकच्या काळात राऊताना आवरा अशी मागणी त्यांच्या पक्षप्रमुखाकडे गेली तर ते आश्चर्य ठरू नये.
मुजोरीच्या वर्गात गणली जाणारी राऊतांची ही शैली शिंदेगटाचे नवे प्रवक्ते दीपक केसरकर यांच्या तर्कशुध्द, शांत, संयमी युक्तिवादामुळे लोकांच्या नजरेत भरली आणि समाजमाध्यमातून त्यांचे मुक्तकंठाने कौतुकही होऊ लागले आहे. त्यांच्या रूपाने एक भारदस्त, गंभीर आणि लोकांना विचार करायला लावणारा प्रवक्ता मिळाला हे मात्र खरे आहे.
मी प्रारंभापासूनच ही दमाची लढाई आहे असे म्हणत आहे.त्याचाच प्रत्यय हल्ली दररोज येत आहे आणि शिंदेगटाचा दम अद्यापही कायमच आहे.

ल.त्र्यं.जोशी
ज्येष्ठ पत्रकार नागपूर

Leave a Reply