सर्व बंडखोर आमदार पुढील 48 तासांमध्ये मुंबईत दाखल होणार!

मुंबई : २६ जून – काय ती झाडी….काय ते डोंगर..काय ते हॉटेल एकदम ओकेच..असं म्हणून गुवाहाटीच्या प्रेमात पडलेल्या बंडखोर आमदारांना आता बॅग भरण्याचे आदेश देण्यात आले आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी राजभवनावर दाखल झाल्यामुळे हालचालींना वेग आला आहे. सर्व बंडखोर आमदारांना पुढील 48 तासांमध्ये मुंबईत आणले जाणार अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
शिवसेनेचे नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाचा आज पाचवा दिवस उजाडला आहे. शिवसेनेच्या 38 आमदारांसह गुवाहाटीमध्ये गेल्या पाच दिवसांपासून आमदार तळ ठोकून आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी कोरोनावर मात करून आता राजभवनावर दाखल झाले आहे. त्यामुळे हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे. गुवाहाटीमधील आमदार येत्या ४८ तासात मुंबईमध्ये परतणार असल्याची माहिती समोर आली आहे.
आज रात्री किंवा उद्या रात्री सर्व आमदार मुंबईत दाखल होणार आहे. शिंदे समर्थक आमदारांना मुंबई विमानतळावर दाखल होण्याची सुचना देण्यात आली आहे. मुंबई विमानतळाला देखील अलर्ट दिला गेला आहे. राज्यपाल आपला विशेषाधिकार वापरुन राज्यातील परिस्थितीचा आढावा घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. तर, शिंदे गटाच्या वकिलांची एक टीम हायकोर्ट आणि एक टीम सुप्रीम कोर्टामध्ये दाद मागण्याची तयारी करत आहे.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी आज दुपारी 12 च्या सुमारास आमदारांची बैठक बोलावली आहे. या बैठकीमध्ये ज्येष्ठ विधिज्ञ आणि आमदारांमध्ये सल्लामसलत होणार आहे. विधानसभा उपाध्यक्षाकडून गटनेता आणि प्रतोद नियुक्तीचा निर्णय न झाल्यामुळे ही बैठक बोलावण्यात आली आहे. त्यामुळे आता गटनेता नियुक्तीचा वाद हा आता राज्यपालांकडे जाण्याची शक्यता आहे.

Leave a Reply