मन्या च्या काड्या – मनोज वैद्य

बरं झालं विठ्ठला
लय किरीपा झाली
पंढरपूरची वारी माही
खरी कामी आली

आमच्या माणसाले हाय
राजकारणाची मोठी हौस
म्हणे आमदार होतो गडे बघ
पाडीन पैशाचाच पाऊस

काका यायीचे सरपंच
थ यायच्या पन डोक्यात भूत
दिवसभर फिरत राहे
लावून “भाऊ” नावाचं बिरुद

झाले असते हे आमदार
त माहे झाले असते वांधे
किराणा कोणी आणला असता
सोलले असते का कुणी कांदे

गायब असते चार चार दिवस
चुकलं गणित करायला
मीडिया आणि जनतेला सांगावं
साहेब गेले फिरायला

झालं नसते काही तरी
दवाखान्यात नेऊन टाकते
जीव धरून मुठीत मंग
शेपूट घालून पळावं लागते

घरीच रहा बापा तुमि
बाळ्या संग खेळत जा
दळण, भाजी, केरकचरा
थोडी मदत करत जा

कोणी बी येवो दारात
म्हनिन” इधर आये कायको”
खरं सांगते शौक नाय मले
बनावं आमदाराची बायको

मनोज वैद्य, नागपूर

Leave a Reply