पंतप्रधान मोदी जर्मनी आणि संयुक्त अरब अमिरातीच्या दौऱ्यावर

नवी दिल्ली : २६ जून – पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या जर्मनी आणि संयुक्त अरब अमिरातीच्या दौऱ्यावर आहेत. जर्मनीमधील आयोजित जी-७ शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत. पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी जर्मनीचे चान्सलर ओलाफ स्कोल्स यांच्यासह अनेक पदाधिकारी विमानतळावर उपस्थित होते.
जी-७ शिखर परिषदेत पंतप्रधान पर्यावरण, ऊर्जा, हवामान, अन्न सुरक्षा, आरोग्य, लैंगिक समानता आणि लोकशाही या विषयांवर आपले विचार मांडण्याची शक्यता आहे. या महत्त्वाच्या मुद्द्यांवर आंतरराष्ट्रीय सहकार्य मजबूत करण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून अर्जेंटिना, इंडोनेशिया, सेनेगल आणि दक्षिण आफ्रिका यासारख्या इतर लोकशाही देशांनाही या परिषदेसाठी आमंत्रित करण्यात आलं आहे. जी-७ शिखर परिषदेत पंतप्रधान मोदी सहभागी देशांतील काही नेत्यांसोबत द्विपक्षीय बैठक घेणार आहेत.
शिखर परिषदेनंतर मोदी युएईला भेट देणार आहेत. युएईचे माजी राष्ट्रपती शेख खलिफा बिन झायेद अल नाह्यान यांच्या निधनाबाबत मोदी शोक व्यक्त करतील. तसेच युएईचे नवे अध्यक्ष महामहिम शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांचे मोदी अभिनंदनही करतील. २८ जून रोजी मोदींचा अरब दौरा संपणार असून ते भारतात परत येणार आहेत.

Leave a Reply