सडेतोड – वीरेंद्र (भाई) देवघरे

राजकारणातील धुरंधर – देवेंदर

राजकारणी योद्धा कसा असावा! सत्ताधारी विनाकारण शिव्या घालत असताना, शांतपणे आपल्या चाली खेळत तीन पायाच्या खुर्चीच्या बुडाला खोलवर बुडवीत कोलमडायला भाग पाडणारा राजकारणातील धुरंधर जेत्ता. म्हणजे देवेंद्र फडणवीस.
अर्थात बंद दरवाज्या मागे अमित शहांशी ऊद्धव ठाकरेंच्या चर्चेचा हवाला देत शिवसेनेने भाजपा च्या पाठीत सुरा खुपसला. भारताच्या इतिहासातील अशी पहिलीच् घटना. ऊद्धव ठाकरेंनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना वचन दिल्याची बतावणी करीत, भाजपाची २५ वर्षांची साथ सोडली. लोकांचा , सर्वसामान्यांचा आक्षेप शिवसेनेने भाजपा सोडण्याशी नव्हता. तर ज्या प्रकारे अमित शहा आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना दिलेल्या वचनांची पुर्ती अशी लांछन लावत, मतभिन्नता असणारे पक्ष, हिंदू विरोधी पक्ष यांचे सोबत शिवसेना गेली. मोदींच्या नावाने हिंदू मतदारांची फसवणूक करून स्वार्थी वृत्तीने हिंदू मतदारांवर आसुड ओढला, त्या प्रकारावर होती. भाजपा पासून विभक्त होण्याचा प्रकार आणि मार्ग कपटी होता. कुसंगत होता. न्यायसंगत नव्हता. ही चिड जनमानसात होती.
अगदी सुरुवातीला बघाल तर शिवसेनेने अधिकृत युती केली ती भाजपा शी. आणि छुपी अनधिकृत युती केली ती राकॉं शी. अर्थात हा सगळा प्रकार पडद्यामागे खेळणारा सुत्रधार होता तो, प्रशांत किशोर. ह्याचे विश्लेषण करण्याची पद्धत एकदम मस्त. हा जो मार्गदर्शन करतो. प्रशांत किशोर ला मानावे लागेल. निवडणूक पुर्व जे काही राजकीय विश्लेषण केले त्यामध्ये त्याच्या ही लक्षात आली की महाराष्ट्रात निवडणुकीची हवा भाजपा ची आहे. जर भाजपाचे कमी आमदार आणायचे असतील तर कृत्रिम परिस्थिती तयार केली गेली आणि अमित शहा नाही म्हणत असताना देवेंद्र फडणवीसांना निवडणुकीसाठी युती करण्यास बाध्य केले. प्रशांत किशोर च्या जाळ्यात अडकले.
तुम्हाला आठवत असेल त्यावेळी संजय राऊत टीव्हीवर सांगत होते की बाप रे! भाजपा एका एका सीट साठी आम्हाला किती भांडावे लागत आहे! आम्हाला किती कमी सीट देताहेत! वगैरे वगैरे! हा डाव भाजपाच्या सीटा जितक्या कमी करता येतील लढविण्यासाठी तितक्या कमी करण्याचा प्रयत्न सुरू झाला. जेणेकरून भाजपाला एक जोडीदार सरकार बनविण्यासाठी निश्चित लागणार.
देवेंद्र फडणवीस – २०१४ ते २०१९ असा पाच वर्षाचा निर्धारित कालावधी पुर्ण करणारा महाराष्ट्राचा हा दुसरा मुख्यमंत्री. पहिला मान श्री वसंतराव नाईक ह्यांना जातो. १९६७-१९७२ हा संपूर्ण पाच वर्षाचा कालावधी त्यांनी पुर्ण केला. त्या अगोदर त्यांनी ०५-डिसेंबर-१९६३ रोजी पदभार सांभाळला व सलग १९६७ साली परत मुख्यमंत्री पदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली आणि त्यापुढील सलग पाच वर्षे निर्धारित कालावधी त्यांनी पुर्ण केला. खुद्द शरद पवार चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेत पण त्यांची कारकीर्द कधी ही पाच वर्षे टिकली नाही.
बरे! २०१४-२०१९ शिवसेनेला फरफटत भाजपा बरोबर येणे भाग पडले. कारण?? कारण – शरद पवार. जी काही थोडीफार कमी जागा होत्या भाजपा कडे. शरद पवारांनी भाजपा ला विनाशर्त समर्थन दिले. शरद पवार एका मुलाखतीत मान्य करतात की त्यांना कसे ही करुन शिवसेनेला भाजपा तून विलग करायचे होते. इथे शिवसेना सत्तेत जरी आली तरी भाजपा वर शिवसेनेचा वचक नव्हता. ह्याला कारण देवेंद्र फडणवीसांची प्रशासकीय पकड आणि त्यांना त्यांचे कामाची जाण. त्यामुळे असे म्हणतात की शिवसेनेच्या शीर्ष नेत्यांवर फडवीसांची बारीक नजर होती. आर्थिक व्यवहारात कुठे गफलत तर होत नाहीनं, ह्या कडे पैनी नजर होती. त्यामुळे शिवसेना अस्वस्थ होती.
प्रत्येक पक्षाची आपली कार्य करण्याची पद्धत असते. आर्थिक स्त्रोतांचे त्रैराशिकं असतात. सत्तेत आल्यानंतर येणारा पैसा जनसामान्यांच्या योजनांपर्यंत पोचतोय १००% पोचतोय म्हटल्यावर कदाचित मित्रपक्षाचा विरस झाला. त्यांनी भाजपा ला सत्तेत भागिदारी असून देखील घेरणे सुरू केले. आम्ही खिशात राजीनामा घेऊन फिरतोय वगैरे वगैरे….. तरी बरे शिवसेनेचा आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत म्हणजे बीएमसी आणि फडणवीसांनी बीएमसी शिवसेनेला आंदणात दिलेली. म्हणजे सत्तेत भागीदार असल्यानंतर ही भाजपा ला त्रास देणे शिवसेने चे सुरू होते. म्हणून भाजपाने विचार केला असता तर बीएमसी आपल्याकडे ठेऊ शकले असते. पण मोठ्या मनाने त्यांनी बीएमसी शिवसेनेच्या हवाली केली.
ह्या पाच वर्षात भाजपाला अनेक प्रकारे त्रास देण्यात आला. त्यातल्या त्यात तर “मराठा आरक्षण” हा मुद्दा शरद पवारांचा मास्टर स्ट्रोक मानला गेला. पण फडणवीसांनी मराठा आरक्षण कायद्यांतर्गत दिले आणि सर्व विरोधकांचे टाळके शांत केले.
फडणवीसांची प्रशासकीय पकड, काम करण्याची शैली, व्यवस्थित आर्थिक व्यवहार, आर्थिक निती, आमदारात तुझा माझा असा भेदभाव न करता महाराष्ट्राच्या विकासाला प्राधान्य दिले. इथेच शिवसेनेच्या शीर्ष नेतृत्वात किडा वळवळला.
२०१९ पासून परत जर फडवीसांचे अधिपत्याखाली पाच वर्षे काढायची! हुडहुडी भरली. शिवसेना नेत्यात आणि कमान प्रशांत किशोरच्या हाती सोपविण्यात आली. प्रशांत किशोर – हा प्राणी असा आहे की ज्या ज्या राज्यात ह्याने भाजपा विरोधात सरकारे दिलीत, त्या त्या राज्यात अनागोंदी कारभार आणि हिंदू विरोधी, राष्ट्रद्रोही नेते सत्तेत आले.
आता आपण असे जरी म्हटले की देवेंद्र फडणवीस जाळ्यात अडकले आणि युती केली. तरी पण जे काही झाले ते बरे झाले! कारण दिसणारे जाळे जरी एक हाती शिवसेना सत्तेच्या चष्म्यातून बघत असली तरी शरद पवारांचे त्यामागचे जाळे शिवसेनेसाठी लावलेले अदृश्य जाळे शिवसेनेला दिसले नाही. भाजपा आणि शिवसेना वेगळे करायचे आहे. म्हणजे शिवसेना संपणार. शिवसेना संपविण्यासाठी फार पुर्वीपासून प्रयत्नरत आहे ती संधी राकॉं ला अनायसे चालून आली. मग पर्यायाने महाराष्ट्र राजकारणातून एक पक्ष बाद होतो. आजच्या घटकेला राकॉं ने संपुर्ण शिवसेना संपविली. जे काम राकॉं इतके वर्षे करु शकले नाही ती संधी त्यांना २०१९ साली मिळाली. ह्यामध्ये मोठी चुक होती ती शिवसेना नेतृत्वाची ज्यांना प्रशांत किशोर चे जाळे दिसले पण राकॉं ने लावलेले अदृश्य जाळे बघु शकले नाही.
आता इथे सुद्धा युतीत फसविले भाजपा ला अधिकृतपणे आणि संपादकाच्या मध्यस्थीने निवडणुकपुर्व अनधिकृत युती राकॉं शी केली. शिवसेना संजय राऊत ची गंमत आहे. हा माणूस सारे जग स्वतः च्या चष्म्यातून बघतो आणि त्याप्रमाणे बोलतो. राजकारणातील दूरदृष्टी नसणारा हा शिवसेनेचा मध्यस्थ. आणि ऊद्धव ठाकरे तर पहिले पासून सांगताहेत मला सांभाळून घ्या. ज्यांना निवडणूका कशा लढवायच्या माहिती नाही. ज्या मध्यस्थ संजय राऊत ला मध्यस्थीची महत्ता अवगत नाही अशी शिवसेना अलगद राकॉं च्या बगलेत येवून बसली. गंमत म्हणजे बाळासाहेब ठाकरे म्हणायचे हा माणूस चांगला आहे. पण विश्वास ठेवण्यास पात्र नाही. शरद पवारांचा पुर्वेतिहास बघितला तर ज्यांना ज्यांना युतीसाठी सामावून घेतले ते ते पक्ष आज दोन चार सीटांवर सामावलेले आहेत. त्यावर त्यांची सभागृहात उपस्थिती नसते. आता शिवसेनेची पण तीच् गत होणार. बघा तुम्ही. संजय राऊतांनी आपल्याकडून किल्ला लढविला. की भाजपा तून विभक्त होण्यासाठी. क्षणिक सुखासाठी शिवसेनेचा बळी देणारा सल्लागार म्हणजे संजय राऊत आणि ऊद्धव ठाकरे. मुख्यमंत्री पदाला मिळणारा मान सन्मान हे दृश्य ही जोडगोळी बघत होती. आपल्या युतीमुळे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाचा मान सन्मान भोगताहेत ही जोडगोळी मनात कुढत होती. मुख्यमंत्री पदाचा मान त्याच्या कर्तृत्वाचा मान असतो. कपट, कारस्थान करुन मिळविलेल्या पदाचा नसतो. पुर्वीच्या कट कारस्थान करून मिळवलेल्या मुख्यमंत्री पदाचा इतिहास चाळून पहा. पाच वर्षाची कारकीर्द असे सरकार पुर्ण करू शकत नाही.
असे म्हणतात की २०१९ ऐन निवडणुकांच्या काळात जवळपास ३५ शिवसेनेच्या जागांवर वेळेवर मदत पोचली नाही म्हणून हे शिवसेनेचे आमदार हारणार होते. त्यावेळी त्यांनी शिवसेना मदत करीत नाही म्हणून फडणवीसांनी हवी ती मदत केली आणि हे शिवसेनेच्या ३५ आमदारांच्या विजयाचा शिल्पकार देवेंद्र फडणवीस होते. असं लोकं सांगतात. शिवसेनेचा जमिनीवरचा शिवसैनिक हा कट्टर शिवसैनिक आहे. खाल्ल्या मिठाला जागणारा शिवसैनिक आहे. हा ३५ आमदारांचा गट सुरुवातीपासून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांचे सोबत कायम होता. ही कुणकुण सर्वांना होती.
भाजपा १०६ आणि शिवसेना ५६ आमदार युतीचे निवडून आले. युती ने मतं मागितली मोदी आणि भाजपाच्या भगव्यावर. आणि सत्ता स्थापनेच्या वेळी एक नवीन वाद सुरू केला. तो म्हणजे अमित शहा यांनी दिलेले ५०-५० चे वचन. बंद खोलीत ही चर्चा झाल्याचे अमित शहा ह्यांनी मान्य केले पण हा विषय अर्धवट राहिला. पुर्ण चर्चा झाली नाही. असे वचन सुद्धा आम्ही दिले नाही की अडीच वर्षे मुख्यमंत्री पद वाटल्या जाईल. जाहीर सभेत देखील सर्वांसमक्ष मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांचा चेहरा होता.
भाजपा नेतृत्व लगेच ओळखून घेते की कोणाच्या मनात आहे! पुढची रणनीती काय! आणि त्यातील शिवसेना शीर्ष नेतृत्वाने भाजपाचा विश्वासघात केला, हिंदू मतदारांचा विश्वासघात केला, शिवसैनिकांच्या इच्छेविरुद्ध जाण्याचा निर्णय शिवसेना नेतृत्वाने घेतला. ह्या सर्व प्रकारात अतिशय घाणेरडे राजकारण खेळल्या गेले. भाजपा शी साखरपुडा लावणारी शिवसेना, निवडणूकी नंतर राकॉं, कॉंग्रेस सोबत बोहल्यावर लग्न करायला उभी राहिली. आणि इथे शिवसेना शरद पवारांच्या अदृश्य जाळ्यात फसली. एक तर असल्या राजकारणात नवीन ही जोडगोळी अर्ध्या हळकुंडात पिवळी झाली आणि धुर्त राकॉं कॉंग्रेस ह्यांच्या कावेबाज “कॉमन मिनिमम प्रोग्राम” मध्ये मान्य झाली. शिवसेनेने फक्त एका “मुख्यमंत्री” पदासाठी संपुर्ण शिवसेना पणाला लावली. नेतृत्व कसे नसावे – ह्याचे उत्तम द्योतक. ज्या छत्रछायेखाली शिवसेना वाढली. राकॉं कॉंग्रेस ला दूर ठेवले म्हणून शिवसेना अस्तित्वाला महत्ता मिळाली (हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे कित्येक चलचित्र उपलब्ध आहेत) , आज त्याच शिवसेनेचे नेतृत्व राकॉं आणि कॉंग्रेस पदी झुकले वाकले आणि संपले. मुख्यमंत्री देवेंद्र च्या वर्चस्वाचे ओझे अमान्य करीत. निर्बुद्ध, दृष्टिहीन शिवसेना नेतृत्वाने दोन जोखड आपल्या मानेवर बांधून घेतले, दोन पट्टे आपल्या बुद्धीला जोडले आणि नंतर दिशाहीन भरकटले. एका मुख्यमंत्री पदाच्या हव्यासा पायी अर्धे साम्राज्य सोडून एक बटा तीन म्हणजे एक तृतीयांश सहभाग मान्य केला. आणि संपुर्ण महाराष्ट्रात हसं करून घेतले. ही युती सामान्य शिवसैनिकांना अमान्य होती. धाकदपटशा दाखवून. गुप्त मतदान पद्धत न अवलंबता, शिवसैनिकांच्या इच्छेविरुद्ध सरकार स्थापनेसाठी आमदारांचे मतदान घेण्यात आले आणि सरकार स्थापन करण्यात आले.
दरम्यान भाजपा सोबत अजित पवार ह्यांचा शपथविधी झाला. पण असे म्हणतात की सरसंघचालक मोहनजी भागवत ह्यांचा ह्या युतीला विरोध होता. राजकारण्यांची विचार पद्धत आणि संघाची विचार प्रणाली ह्यात जमीन अस्मानाचे अंतर. सर्व जगाने देखील मान्य केले आहे की संघ विचार प्रणाली ला तोड नाही. त्यांचे म्हणणे प्रमाणे भाजपाला आपल्या हिंदुत्वाच्या अजेंडा ला पदोपदी बळी द्यावा लागेल. त्यांची कार्यपद्धती वेगळी भ्रष्टाचाराचे बालंट वगैरे वगैरे एकंदर भाजपाच्या हिंदुत्ववादी स्वच्छ छबीला कलंक लागेल. पण हिंग लगेना फिटकरी – अजित पवार स्वतः विलग झाले. आणि ही माझी चूक होती हे देवेंद्र फडणवीस मोठ्या मनाने मान्य करतात.
राजकारण इथे येवून थांबलं असतं तर ठीक. शिवसेनेला एक मोठी संधी चालून आली होती स्वतः ला मोठ्या पटलावर सामान्य जनांच्या मनामनात घर करून लोकप्रियतेच्या शिखरावर आरूढ होण्याची. एक परिपक्व राजकारणाची खेळी खेळण्याची. पण शिवसेनेने भ्रष्ट राजकारणाचा मार्ग अवलंबला, त्याला खरे ठरविण्यासाठी रोज पहाटे प्रातर्विधी पत्रकार परिषदा घेण्याचा सपाटा चालविला आणि अमित शहा, देवेंद्र फडणवीस, अमृता फडणवीस ह्यांचे वर नको त्या टिप्पणी करीत वृत्तवाहिन्यांवर अपमान करणे सुरू केले. शरद पवार किती मोठे हे दाखविण्याचा प्रयत्न सुरू झाला. सत्तेचा माज दाखवायला सुरुवात केली आणि भाजपा शीर्ष नेतृत्वाला अपमानित करण्याची एक ही संधी शिवसेनेने सोडली नाही. राकॉं किंग मेकर भुमिकेत असल्याने ते आपल्या चाली दबक्या शांत परिपक्व खेळत होत्या पण अब तक ५६ आमदारवाले भाजपाला अपमानास्पद वागणूक देत अपरिपक्व खेळीचे प्रदर्शन करीत होते. ह्या सर्व गोष्टी भाजपाच्या जिव्हारी लागणाऱ्या होत्या. पण देवेंद्र फडणवीस शांत धीरगंभीर, हसत मुखाने सर्व सहन करीत होते.
आता ज्या शरद पवारांना समजायला शंभर वर्षे लागतील अशी विधानं करणारा संजय राऊत आणि भ्रष्टाचारासाठी वाझे ला आणणारी शिवसेना, पेन ड्राईव्ह, ६.५ जीबी डेटा, अशी कितीतरी प्रकरणं उभी करून शिवसेनेने आपल्या पायावर धोंडा मारुन घेतला. फडणवीसांनी त्यांना सळो की पळो करून ठेवले. पण राजकारणी कसा असावा! मुरब्बी, कुट नितीज्ञ, चाणाक्ष, धुर्त आणि विरोधकात धाक असणारा. सर्व गुणांनी परिपूर्ण देवेंद्र फडणवीस.
ज्या शरद पवारांची बोटं धरुन संजय राऊत आणि ऊद्धव ठाकरे मैदानात उतरले. वरकरणी जरी ही मंडळी राजकारणात परस्पर विरुद्ध उभी ठाकणारी असली तरी प्रत्यक्षात नातेवाईक आहेत. असे म्हणतात! शरद पवारांची मुलगी ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ह्यांच्या भाच्याला दिली आहे. असे म्हणतात. हे जर खरे असेल तर एवढेच म्हणावे लागेल की तुम्ही आम्ही मुर्ख आहोत. राजकारणाची खळगी भरण्यासाठी आपापली संपत्ती वाढविण्यासाठी आणि सामान्य जनतेला मुर्ख बनविण्यासाठी आता एकत्र आली आहेत. असे म्हणायला पुर्ण वाव आहे. एवढेच नव्हे तर पुढील हजार पिढ्यांची बेगमी करून ठेवलेली ही मंडळी, भ्रष्टाचारात लडबडलेली असली (असे सर्वसामान्य जनतेचे मत) तरी कोणतेही सरकार ह्यांचा बाल बाका करू शकणार नाही. एवढ्या ताकदीचा हा परिवार.
पण भाजपा, देवेंद्र फडणवीस शांत संधीची वाट पाहत, अपमान सहन करीत होते. इकडे ५० वर्षाची राजकीय कारकीर्द असणाऱ्या शरद पवार ह्यांच्यावर विश्वस्त शिवसेनेच्या नाकावर टिच्चून राज्यसभा आणि विधानसभा दोन निवडणूकांचे निकाल भाजपाने स्वतः कडे वळविले. आणि राजकीय “Unrest” चा फायदा कसा घ्यायचा असतो हे दाखवून दिले. राजकिय अपमानाचा मोबदला कसा असतो हे दाखवून दिले. ह्या वयात सुद्धा शरद पवारांना मात देणारा धुरंधर राजकारणी म्हणून देवेंद्र फडणवीसांची गणना निश्चित होणार. दोन दिवसात सर्व तिघाडी मध्ये मीठ कालवणारा अकेला देवेंद्र फडणवीस म्हणून ह्यांची गणना होणार. अनपेक्षित, अती गुप्त हालचाली, अती तीव्र आघात कसा करायचा आणि प्रतिस्पर्ध्याला फशी कसे पाडायचे ह्याचे उत्तम उदाहरण म्हणजे देवेंद्र फडणवीस. अशा बातम्या चमकून राहिल्या आहेत की महाराष्ट्र सरकारने अवघ्या ४८ तासात १०६ जीआर काढलेत. अर्थात भ्रष्टाचाराची प्रकरणे दाबायचे जीआर आहेत का काय? अशी शंका रास्त आहे. ईडी कडे हे जीआर द्यावेत, अशी चर्चा सोशल मिडिया वर सुरू आहे.
सत्ता आल्यानंतर सत्तेचा माज असणारी हुकुमत, वैयक्तिक पातळीवर कंगना, राणा, केतकी राजकीय सत्तेचा फायदा घेणारी शिवसेना. गैरव्यवहार, भ्रष्टाचाराला ऊत आणणारे महाराष्ट्र सरकार ह्या सर्वांवर मात करीत एका रात्रीत सरकारचे तारे जमीन पर आणणारे भाजपा नेतृत्व.
पुढे काय होणार! कसे होणार! होणार की नाही होणार! हे सर्व काही दिवसातच् कळेल. सत्तेवर कोण येणार आणि कोण सत्ता बेदखल होणार हे राजकीय खेळींवर अवलंबून आहे. कारण पुरजोर प्रयत्नांनंतर राजस्थानची खेळी चुकली होती. त्याचा धडा घेत अर्थातच ह्यावेळी भाजपाने आपले पत्ते पसारले असणार. शिवसेनेचे आमदार शिवसेना नेतृत्वाविरुद्ध झाले आहे.
सरकार कसे नसावे! महाराष्ट्राचे सध्याचे सरकार एक उत्तम उदाहरण आहे. तर ते सरकार संपवायचे कसे त्याचे द्योतक देवेंद्र फडणवीस आहेत. ज्या ३५ शिवसेना आमदारांना फडणवीसांनी मदत केली करून निवडून आणले. त्याच ३५ आमदारांनी आता बंडाचा उभारलेला झेंडा ४१ आमदारांपर्यंत येवून उभा ठेपला आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ह्यांच्या पक्षाचे असे हाल व्हावे. एक शिवसैनिक म्हणुन निश्चितच हृदयात वेदना होतात. राऊतांनी बाळासाहेबांची हिंदुत्ववादी शिवसेना रडकुंडीला आणली. भाजपा शी युतीत राहिले असते तर आज मान सन्मान सर्व मिळाला असता असे पदोपदी वाटते. पण “मुख्यमंत्री” पदाच्या हव्यासाने घात केला.
साखरपुडा एकाशी आणि बोहल्यावर दुसऱ्याशी करणाऱ्याचे काय हाल होतात? ह्याचे उत्तम उदाहरण म्हणजे महाराष्ट्र सरकार. इतका पैसा अडका असताना साठाव्या वर्षी माणूस रिटायर्ड होतो.स्वतः च्या विश्वात जगतो. पण ८१ व्या वर्षी सुद्धा पुर्वार्जित कर्मामुळे प्राप्त परिस्थिती ला हाताळावे लागत आहे ह्याचे उत्तम उदाहरण म्हणजे शरद पवार. विरोधकांवर शांतपणे सुड कसा उगवला जाऊ शकतो ह्याचे उत्तम उदाहरण म्हणजे देवेंद्र फडणवीस. हा माणूस वृत्तवाहिन्यांवर मुलाखती देतो तेव्हा चेहरा हसरा असतो. संदर्भ तार्किक असतात. विनाकारण फालतू बोलत नाही. “जो गरजते है वो बरसते नहीं!” आता तुम्ही समजून घ्या मी काय म्हणतोय. शेराला सव्वाशेर भेटला आणि ” पवारांना सव्वा पवार भेटला” असे म्हणायला हरकत नाही. देवेंद्र फडणवीस ह्यांची ओळख एक “धुरंधर राजकारणी” म्हणून निश्चितच करेल. कौरवांच्या तावडीतून महाराष्ट्र रुपी द्रौपदीला सोडविले म्हणून महाराष्ट्र तुमचा सदैव ऋणी राहील. कारण मविआ राजवटीत अडीच वर्षात महाराष्ट्राने काय सोसले हे जनता जाणते. सत्ताधारी तर मलई खाण्यात व्यस्त होते.
शेवटली बातमी हाती आली तेव्हा देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना झाले अशी आहे.
भगवंता, आता परत महाराष्ट्र राज्य चांगल्या हातात ठेव ही नम्र विनंती! १२ कोटी महाराष्ट्र जनतेतर्फे लवकरात लवकर “रामराज्य” असणारे सरकार महाराष्ट्राला लाभो ही विनंती आणि शुभेच्छा!

भाई देवघरे

Leave a Reply