या चिमण्यांनो… परत फिरा – विनोद देशमुख

शिवसेनेच्या दोन सत्तासंघर्षात आता भावनिक मुद्दे जास्त महत्त्वाचे ठरू पाहत आहेत. विशेषत: संजय राऊत याचे पासे फेकताना दिसतात. आज तर त्यांनी कमालच केली. “शिवसेना मविआतून बाहेर पडायला तयार आहे” असे खळबळजनक विधान त्यांनी केले. फक्त त्याला एक जरतर जोडले- “24 तासांच्या आत मुंबईत येऊन शिवसेना पक्षप्रमुखांना स्वत: सांगा. त्यावर योग्य तो निर्णय घेतला जाईल” असे स्वच्छ आश्वासन त्यांनी दिले. हे मी हवेत बोलत नाही, असा खुलासाही त्यांनी लगेच केला. यावरून शिवसेना नेतृत्व आता पूर्णपणे हतबल झाल्याचे मानले जात आहे.
याचे कारण, शिवसेनेचे दोनतृतीयांश आमदार एकनाथ शिंदेंच्या पाठीशी आहेत, असे आता जवळजवळ स्पष्ट होत आहे. शिवसेनेचे 56 आमदार विधानसभेत होते. त्यातील एकाचे निधन झाले. त्यामुळे 55 चे दोनतृतीयांश होतात 37. तेवढे आमदार आपल्याकडे असल्याचा दावा शिंदे यांनी विधानसभा उपाध्यक्षांना पत्र पाठवून केला आहे. या पत्रावर सर्व आमदारांच्या सह्याही आहेत.‌ त्यावर उपाध्यक्ष काय निर्णय घेतात आणि राज्यपाल काय भूमिका घेतात, यावरच हे बंड होते की चहाच्या पेल्यातील वादळ होते, हे ठरणार आहे.
आता काॅंग्रेस-राष्ट्रवादी यांच्यातील मतभेदही चव्हाट्यावर येऊ लागले आहेत. शिवसेना आमदारांना निधी मिळत नव्हता, हा शिंदे गटाचा आरोप काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी आज उचलून धरला आणि एकप्रकारे राष्ट्रवादीला चिमटाच काढला. तसेच, शिवसेनेतील बंडाला भाजपाची फूस आहे की नाही, यावरही त्यांच्यात मतभिन्नता असल्याचे बाहेर आले आहे. नाना पटोलेंनी भाजपावर आरोप केला असतानाच, अजित पवार आणि जयंत पाटील मात्र भाजपाला दोष देण्यास आजतरी तयार नाहीत. यावरून दोन काॅंग्रेसमधील कलगीतुऱ्याचे उपकथानक आता रंगणार, हे निश्चित.

विनोद देशमुख

Leave a Reply