घराणेशाहीचा घोळ ! – विनोद देशमुख

एकनाथ शिंदे यांच्या बंडाला दोन दिवस होत आले तरी तिढा सुटलेला नाही. कारण, हा लढा आता हिंदुत्वासोबतच शिवसेनेतील घराणेशाहीच्या वळणावर येऊन ठेपला आहे. शिंद्यांनी हिंदुत्वाचा मुद्दा लावून धरला आहे, तर मुख्यमंत्र्यांनी ठाकरे घराणेशाहीचे भावनिक कार्ड खेळून शिवसैनिकांना साद घातली आहे. शिवसेना आपल्या, म्हणजे ठाकऱ्यांच्याच ताब्यात राहावी, यासाठी ही धडपड असल्याचे स्पष्टपणे जाणवते.
याचे मुख्य कारण, घटनात्मक तरतूद आहे. पक्षांतरविरोधी कायद्यानुसार, दोनतृतीयांश सदस्यांची फूट वैध ठरते आणि आपोआपच हा गट मोठा असल्यामुळे मूळ पक्ष त्यांच्या ताब्यात जाऊन, एकतृतीयांश अल्पमतातील मूळ पक्ष हा मात्र गट बनून जातो ! (1969 मध्ये इंदिरा गांधींनी काॅंग्रेसचे हेच हाल केले आणि मूळ पक्ष ताब्यात घेतला, हा इतिहास आहे.) ही अवस्था टाळण्यासाठीच उद्धव ठाकरेंनी भावनिक कार्ड बाहेर काढले आहे. मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख ही दोन्ही पदे सोडण्याची जाहीर तयारी दाखविणे आणि त्याचवेळी मातोश्री बंगल्याजवळ शक्तिप्रर्शनाचे आयोजन करणे, या दोन परस्परविरोधी गोष्टी याचीच साक्ष देतात.
फेसबुक लाईव्ह मध्ये मुख्यमंत्र्यांनी मूळ मुद्यालाच बगल दिली, हे सर्वांनीच पाहिले. शिंद्यांनी मुख्यमंत्रिपद किंवा पक्षप्रमुखपद हे मुद्देच काढले नाहीत.‌ त्यांचा एकच मुद्दा आहे की, बाळासाहेबांच्या हिंदुत्वासाठी राष्ट्रवादी आणि काॅंग्रेस यांच्याशी नाते तोडा आणि पुन्हा भाजपाशी नाते जोडा. यावर उद्धव ठाकरे स्पष्ट काहीच बोलले नाही. उलट, दुसरा शिवसैनिक मुख्यमंत्री व्हावा, अशी लालूच त्यांनी शिंद्यांना दाखविली. परंतु, गेल्या अडीच वर्षात सत्ताधारी शिवसेनेने हिंदुत्वाची वाट लावली, अशी त्याच पक्षात सर्वसाधारण भावना आहे आणि शिंदे तीच कॅश करीत आहेत. त्यामुळेच त्यांच्या पाठीराख्या आमदारांची संख्या वाढताना दिसत आहे.
एकूण, महाराष्ट्राच्या राजकारणात हिंदुत्वाचा मुद्दा एवढ्या प्रखरतेने प्रथमच केंद्रस्थानी आलेला आहे आणि दुसरीकडे ठाकऱ्यांच्या घराणेशाहीलाही पहिल्यांदाच जबर आव्हान देण्यात आले आहे. काॅंग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन्ही घराणेशाहीवादी पक्ष स्वाभाविकच उद्धव ठाकरेंच्या पाठीशी राहणार आहेत. या स्थितीत, शिवसेनेतील सर्वात प्रभावी लोकनेता असलेला एकनाथ शिंदेंसारखा कटृर शिवसैनिक ठाकऱ्यांचे राज्य खालसा करण्यात यशस्वी होतो काय, ते पाहायचे !

विनोद देशमुख

Leave a Reply