कारागृह अधिकारी व गुंडाची ध्वनिफीत व्हायरल, पैश्याच्या व्यवहाराची बोलणी

नागपूर : २४ जून – बंदीवानांच्या मृत्यूने मध्यवर्ती कारागृहातील कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असताना आता बंदीवानांना ‘गैरमार्गा’ने सुविधा पुरविण्यात येत असल्याने पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. कारागृहातील अधिकाऱ्याला देण्यात आलेल्या पैशाच्या पाकिटाशी संबंधीत संवादाची ध्वनीफित समाजमाध्यमावर व्हायरल झाल्याने कारागृह प्रशासनात प्रचंड खळबळ उडाली आहे. या व्हायरल ध्वनीफितीमुळे कारागृहातील भ्रष्टाचार पुन्हा एकदा समोर आला आहे.
जाफरनगरमधील गुन्हेगार इम्रान हा कारागृहात आहे. त्याला सुख-सुविधा पुरविण्यासाठी त्याचे नातेवाइक प्रयत्न करीत आहेत. बंदीवानाला सुविधा देण्यासाठी कारागृहातील अधिकारी लाखो रुपयांची चिरीमिरी घेत असल्याचे इम्रानचा भाऊ अर्शद व गुंडरे नावाच्या जेलरमधील संभाषणाने समोर आले आहे. या ध्वनीफितीत भटकरचेही नाव आले आहे. या भटकरबाबत कारागृहातील अधिकारीही अनभिज्ञ असल्याची माहिती आहे. काही दिवसांपूर्वी इम्रानचा भाऊ अर्शद याने जेलर गुंडरे यांच्याशी संपर्क साधला. व्हायरल झालेल्या ध्वनीफितीतील पुढील संवादामुळे कारागृह प्रशासनात खळबळ उडाली आहे.
अर्शद : गुंडरे साहेब गूड इव्हिनिंग. मी इम्रानचा भाऊ अर्शद बोलत आहे. तुम्हाला पाकिट (पैशांचे) द्यायचे आहे.

गुंडरे : मी सध्या बाहेर आहे. नंतर बोलू.

अर्शद : हॅलो, गुंडरे साहेब!

भटकर : मी गुंडरे नाही, भटकर बोलत आहे.

अर्शद : सर, माझा मोबाइल दुरूस्तीसाठी टाकला होता. तो दुरूस्त झाला. त्यावर गुंडरे साहेबांचे कॉल येत आहेत.

भटकर : मी बाहेर आहे नंतर बोलतो.

अर्शद : गुंडरे सरांनी मला अजनी चौकात बोलावले आहे.

भटकर : गुंडरे सरांचा दुसरा नंबर घेऊन देतो. बाकी नंतर सांगतो.

अर्शद : गुंडरे साहेब, मी जाफरनगरमध्ये आहे. येथून निघत आहे. कुठे येऊ?

गुंडरे : अजनी चौकातील वॉशिंग सेंटरजवळ ये.

अर्शद : साहेब, मी पोहोचलो. वॉशिंग सेंटरजवळ आहे. पण एक अडचण आहे. माझ्याकडे पाकिट नाही. ती वस्तू (पैसे) तुम्हाला तसेच देऊ का?

गुंडरे : हो, चालेल.

चौकशी सुरू

गुंडरे व अर्शदची ध्वनीफित व्हायरल झाल्याची गंभर दखल घेण्यात आली आहे. याप्रकरणाच्या चौकशीला सुरुवात करण्यात आली आहे. चौकशीनंतर नेमके काय प्रकरण आहे हे स्पष्ट होईल. याबाबत चौकशीनंतरच अधिक सांगता येईल, असे कारागृह अधीक्षक अनुपकुमार कुमरे यांनी सांगितले.

Leave a Reply