हिंदूंच्या अवनतीसाठी मुस्लिम आणि इंग्रजांना दोष देण्याची प्रवृत्ती सोडायला हवी – डॉ. मोहन भागवत

नागपूर : २२ जून – आपल्याला कायम दुसऱ्यांना दोष देण्याची सवय जडली आहे. हिंदू समाजाची अवनती का झाली तर यासाठी आम्ही मुस्लीम आणि इंग्रजांना दोषी ठरवतो. ही दोष देण्याची प्रवृत्ती सोडून अनुभवातून शिकत सुधारायला हवे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.
संघाचे माजी बौद्धिक प्रमुख आणि शिक्षणतज्ज्ञ डॉ. रामभाऊ तुपकरी यांच्या ‘पॅशन इन ॲक्शन’ या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. भागवत यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. आपण तक्रार करण्याचा स्वभाव सोडायला हवा. दुसऱ्यांना दोष दाखवल्याने आपण अशक्त होतो. हिंदू समाजाच्या अवनतीसाठी मुस्लीम, इंग्रजांकडे बोट दाखवून काही होणार नाही. अनुभवातून शिकणे आणि आपल्यात सुधारणा करणे आवश्यक आहे, असे डॉ. भागवत म्हणाले.
वाईट आहे ते सोडून द्या. जग बदलण्याची जबाबदारी कुणी एका व्यक्तीने घेतलेली नाही. तसे प्रयत्न करायला हवे, त्यात काही गैर नाही. मात्र, सगळ्या जगाच्या चिंतेचा भार आपल्या डोक्यावर घेणे हे आपले काम नाही. रामभाऊंच्या पुस्तकात अशा अनेक गोष्टींवर उपदेश करण्यात आला असून सर्वांनी ते वाचावे, असे आवाहनही डॉ. भागवत यांनी केले.

Leave a Reply