शिवसेनेचा बंडखोर आमदारांना इशारा, पक्षाकडून व्हीप जारी

मुंबई : २२ जून – राज्यातील सत्तानाट्याचा आज दुसरा दिवस आहे. शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदारांना घेऊन यापूर्वी सुरत गाठले आणि नंतर आता गुवाहाटीमध्ये मुक्काम ठोकला आहे. शिंदे यांनी बहुसंख्य आमदार आपल्यासोबत असल्याचा दावा केला आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं बंडखोर आमदारांना मोठा इशारा दिला आहे. शिवसेना आमदारांची तातडीची बैठक आज संध्याकाळी (बुधवार) वर्षा बंगल्यावर आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला उपस्थिती आवश्यक असल्याचा आदेश पक्षानं या आमदारांना दिला आहे.
या बैठकीची सूचना विधानसभेत नोंदणी केलेल्या ई-मेल पत्त्यावर पाठवली आहे.त्याशिवाय सोशल मीडिया, व्हॉट्सअप आणि एसएमएसद्वारेही आमदारांना कळवण्यात आले आहे.या बैठकीस लिखित स्वरूपात वैध आणि पुरेशी कारणे दिल्याशिवाय गैरहजर राहता येणार नाही, असा इशारा पक्षानं दिला आहे. या बैठकीला उपस्थित न राहिल्यास शिवसेना सदस्यत्व सोडण्याचा तुमचा इरादा आहे, असं मानले जाईल असा इशारा शिवसेना विधिमंडळ पक्ष कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात देण्यात आला आहे. शिवसेना विधिमंडळ पक्षाचे प्रतोद सुनील प्रभू यांनी हे पत्रक काढले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. एकूण १३ प्रस्ताव ठेवण्यात आले आहे. या प्रस्तावावर चर्चा झाली आहे. तर. ‘काही ही झालं नाही. मुख्यमंत्री नेहमी प्रमाणे आले आणि बैठक झाली. तुम्ही चुकीच्या बातम्या करतात. आमदार शिवसेनेचे गेले आहे. सरकार सद्या सुरू आहे, अशी सूचक प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे.

Leave a Reply