निदर्शने करतांना महिला काँग्रेसच्या अध्यक्षा नेट्टा डिसोझा पोलिसांवर थुंकल्या, व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली : २२ जून – नॅशनल हेराल्डशी संबंधित आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची ईडीकडून चौकशी करण्यात येत आहे. याविरोधात काँग्रेसकडून देशात जोरदार निदर्शने करण्यात येत आहेत. ईडीविरोधात केले जात असलेल्या निदर्शनावेळी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा नेट्टा डिसोझा या पोलीस कर्मचाऱ्यांवर थुंकल्याची घटना घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून डिसोझा यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.
काँग्रेस ईडीविरोधात करण्यात येणाऱ्या आंदोलनात नेट्टा डिसोझा सहभागी झाल्या होत्या. पोलिसांनी जेव्हा त्यांना ताब्यात घेतले आणि बसमध्ये चढवण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा नेट्टा डिसोझा पोलीस कर्मचाऱ्यांवर थुकंल्या. या घटनेनंतर डिसोझांवर भाजपाकडून मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे. भारतीय जनता पक्षाचे (भाजप) प्रवक्ते शहजाद पोन्नावाला यांनी हा व्हिडिओ ट्विट करत काँग्रेसवर टीका केली आहे. ‘लज्जास्पद आणि घृणास्पद, आसाममध्ये काँग्रेस नेत्यांकडून पोलिसांना मारहाण करण्यात आली. हैदराबादमध्ये पोलिसांची कॉलर पकडण्यात आली. आता महिला काँग्रेसच्या अध्यक्षा नेट्टा डिसोझा पोलीस आणि महिला सुरक्षा कर्मचाऱ्यांवर थुंकल्या’. काँग्रेस अध्यक्षा नेट्टा डिसोझा यांच्यावर कारवाई करणार का? असा प्रश्न पोन्नावाला यांनी विचारला आहे.
नेट्टा डिसोझा यांनी ट्विट करून आणखी एक व्हिडिओ पोस्ट केला असून मीडियावर माझ्याविरोधात अपप्रचार केला जात असल्याचा आरोप केला आहे. या व्हिडिओमध्ये माझे केस कसे ओढले गेले, चिखलात ढकलले गेले हे दाखवले आहे. चिखल, धूळ आणि केस माझ्या तोंडात गेले, जे मी माझ्या तोंडातून बाहेर काढले. सुरक्षा कर्मचाऱ्यांचा अनादर करण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता असे नेट्टा डिसोझा म्हणाल्या.

Leave a Reply