एकनाथ शिंदेंनी फेटाळले नितीन देशमुख यांचे आरोप

मुंबई : २२ जून – महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप आणणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या बंडाला आता दर तासाला वेगवेगळे वळण लागताना दिसत आहे. एकीकडे शिवसेनेतील आमदार गुवाहाटीत जाऊन एकनाथ शिंदे यांना सामील होत आहेत. मात्र, त्याचवेळी पहिल्या दिवसपासून एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेले अकोला जिल्ह्यातील बाळापूरचे आमदार नितीन देशमुख हे माघारी परतले आहेत. त्यांनी माघारी परतल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मला फसवून सूरतच्या हॉटेलमध्ये नेण्यात आले होते. त्याठिकाणी माझा घात करण्याचा डाव होता, असा आरोप नितीन देशमुख यांनी केला होता. त्यांच्या या आरोपाला एकनाथ शिंदे यांनीही प्रत्युत्तर दिले आहे.
एकनाथ शिंदे यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधला. त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी नितीन देशमुख यांच्या आरोपांविषयी विचारण्यात करण्यात आली. तेव्हा एकनाथ शिंदे यांनी हा आरोप फेटाळून लावला. मी नितीन देशमुख यांनी जबरदस्तीने घेऊन गेलो असतो तर आमची दोन लोकं त्यांना सोडायला गेली असती का, असा प्रतिप्रश्न त्यांनी विचारला. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी या विषयावर अधिक बोलणे टाळले.
माझा रक्तदाब वाढला नव्हता. पण मला हार्टअॅटक आल्याचा बनाव रचण्यात आला. मला रुग्णालयात नेल्यानंतर २०-२५ जणांना मला पकडून बळजबरीने इंजेक्शन टोचले. ते इंजेक्शन काय होतं माहिती नाही. माझ्या शरीरावर चुकीच्या पद्धतीने प्रक्रिया करण्याचे षडयंत्र रचले होते. मी उद्धव ठाकरेंचा शिवसैनिक आहे, मी मंत्र्यांसोबत गेलो होतो पण मी उद्धव ठाकरे आणि बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. आता मी माझ्या घरी जात आहे. मी रात्री १२ वाजता हॉटेलमधून निघालो. रस्त्यावर तीन वाजता उभा होता. पण माझ्यापाठी २०० पोलीस होते. कोणतेही वाहन मला लिफ्ट देत नव्हते. त्यानंतर पोलीस मला रुग्णालयात घेऊन गेले आणि मला हार्टअॅटक असल्याचा बनाव रचला, असे नितीन देशमुख यांनी सांगितले. उस्मानाबादमधील कैलास पाटील आणि नितीन देशमुख हे दोन माघारी आले आहेत.

Leave a Reply