एकनाथ शिंदे हे ‘नॉट रिचेबल’

मुंबई : २१ जून – विधान परिषदेच्या निकालानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आलेला असतानाच शिवसेनेचे दुसऱ्या क्रमांकाचे नेते एकनाथ शिंदे हे ‘नॉट रिचेबल’ असल्याची माहिती समोर येत आहे. एकनाथ शिंदे यांच्याशी शिवसेनेकडून काल रात्रीपासूनच संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात असून त्यामध्ये सकाळी नऊ वाजेपर्यंत तरी यश आलेलं नाही. असं असतानाच आता एकनाथ शिंदे हे गुजरातमध्ये असल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांनी दिल्या आहेत. मात्र एकनाथ शिंदे नेमके कुठे आहेत यासंदर्भातील ठोस माहिती समोर आलेली नाही.
एकनाथ शिंदे हे काल सायंकाळी विधान परिषदेचा निकाल लागण्याच्या आधीपासूनच शिवसेना नेत्यांच्या संपर्कात नसल्याचं सांगितलं जातंय. एकनाथ शिंदेंसोबत १३ आमदारही शिवसेनेच्या संपर्कात नसल्याची माहिती समोर येत आहेत. याच घडामोडींच्या पार्श्वभूमीवर दुपारी १२ वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सर्व शिवसेना आमदारांची ‘मातोश्री’वर बैठक बोलावली आहे.
एकनाथ शिंदे हे विधान परिषदेच्या निवडणूक प्रक्रियेपासून ते निकालापर्यंत सर्वच गोष्टींपासून अलिप्त होते. ते सोमवारपासूनच नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर आली आहे. सोमवार सायंकाळपासूनच शिंदे आणि १३ आमदार नॉट रिचेबल असल्याचं समजल्यानंतर शिवसेनेच्या विजयी उमेदवारांच्या सेलिब्रेशनऐवजी बैठकीचे आदेश देण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत मुंबई आणि आसपासच्या परिसरातील आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीला शिवसेनेचे बरेचसे आमदार उपस्थित होते. ही बैठक रात्री दोन वाजेपर्यंत सुरु होती.

Leave a Reply