एकनाथ शिंदेंसोबत असलेल्या आ. नितीन देशमुखांची प्रकृती बिघडली, पत्नीने दाखल केली बेपत्ता असल्याची तक्रार

अकोला : २१ जून – शिवसेनेचे नाराज नेते व मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेना आमदारांचा एक गट गुजरातमधील सुरतमध्ये असतांना त्या ठिकाणी अकोला जिल्ह्यातील बाळापूरचे शिवसेना आमदार नितीन देशमुख यांची प्रकृती बिघडल्याची माहिती आहे. त्यांच्यावर सुरत येथील रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे कळते. दरम्यान, आमदार नितीन देशमुख बेपत्ता असल्याची तक्रार त्यांच्या कुटुंबियांकडून अकोला पोलिसात दाखल करण्यात आली आहे.
शिवसेनेतील दुसऱ्या क्रमांकाचे नेते एकनाथ शिंदे गेल्या काही दिवसांपासून पक्षात नाराज आहेत. त्यांनी राज्यातील राजकारणात मंगळवारी मोठा राजकीय भुकंप आणला. त्यांच्या सोबत पश्चिम वऱ्हाडातील तीन आमदार आहेत. बाळापूरचे आमदार नितीन देशमुख सुरत येथे असतांना त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाला. त्यांना हृदयात वेदना होत असल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान, नितीन देशमुख यांचा काल कुटुंबियांशी संपर्क झाला होता. तेव्हा त्यांनी अकोल्यात येत असल्याचे सांगितले होते. मात्र, ते अद्याप परत आले नसल्याने कुटुंबियांनी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली.

Leave a Reply