एकनाथ शिंदेंबरोबर बुलढाण्याचे दोन आमदारही नॉट रिचेबल

बुलढाणा : २१ जून – विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसच्या एका उमेदवाराचा धक्कादायक पराभव झाल्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार धोक्यात आल्याच्या चर्चेला राज्यात पेव फुटले आहे. शिवसेना नेते व मंत्री एकनाथ शिंदे नाराज असून त्यांच्यासोबत शिवसेना आमदारांचा एक गट गुजरातमधील सुरतमध्ये असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. त्या गटात बुलढाणा जिल्ह्यातील शिवसेनेच्या दोन आमदारांचा समावेश असल्याचा कयास बांधला जात आहे. ते दोन्ही आमदार संपर्क क्षेत्राबाहेर आहेत.
शिवसेना नेते एकनाथ शिंदे गेल्या काही दिवसांपासून पक्षात नाराज आहेत. ते विधान परिषद निवडणुकीच्या रणनीतीपासूनदेखील दूर होते. विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराच्या पराभवानंतर आता शिंदे बंड पुकारणार का, यावरून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. दरम्यान, शिंदे यांच्यासोबत बुलढाणा जिल्ह्यातील मेहकरचे शिवसेना आमदार संजय गायकवाड व बुलढण्याचे आमदार संजय रायमुलकर असल्याचे वृत्त समोर येत आहे. हे दोन्ही आमदार संपर्क क्षेत्राबाहेर आहेत. रायमुलकर आणि गायकवाड हे एकनाथ शिंदे गटातील मानले जातात.

Leave a Reply