एकनाथ शिंदेंचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना अमान्य, बोलावली आमदारांची तातडीची बैठक

मुंबई : २१ जून – राज्यसभेपाठोपाठ विधान परिषद निवडणुकीतही भाजपाने महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला आहे. पुरेशी मते नसतानाही भाजपाचे पाचही उमेदवार विजयी झाले. शिवसेना आणि काँग्रेसची मते फुटल्याने भाजपाचा विजय सुकर झाला. दरम्यान एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्याने महाराष्ट्रात राजकीय भूकंप आला असून महाविकास आघाडी सरकार अस्थिर झालं आहे. काही तास नॉट रिचेबल राहिल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तीन प्रस्ताव दिल्याची चर्चा आहे.
पण उद्धव ठाकरे यांना एकनाथ शिंदे यांचा प्रस्ताव अमान्य असल्याची माहिती मिळत आहे. दुसरीकडे, आदित्य ठाकरे यांना विधीमंडळ नेता बनवण्याची तयारी शिवसेनेकडून केली जात असल्याचंही समजत आहे. यानंतर आता राजकीय घडामोडींना वेग आला असून उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनात शिवसैनिकांची तातडीची बैठक बोलावली आहे. शिवसैनिकांना सेना भवनात जमण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे या बैठकीत नेमका काय निर्णय घेतला जातोय, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
शिवसेनेच्या बैठकीबाबतची पुष्टी शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी केली आहे. उद्धव ठाकरेंच्या आदेशानंतर आपण शिवसेना भवनाकडे जात असून सेना भवन हे आमचं ऊर्जास्थान आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. तर आदित्य ठाकरे यांना विधीमंडळ नेता बनवण्याच्या तयारीबाबत विचारलं असता, संबंधित निर्णयाबाबत आपल्याला पुरेशी कल्पना नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
“शिवसेनेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडावी आणि भाजपासोबत सरकार स्थापन करावं, असा पहिला प्रस्ताव एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना दिल्याचं समजत आहे. तर आगामी नवीन सरकारमध्ये भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतील आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री असतील, असा दुसरा प्रस्ताव आहे. उपमुख्यमंत्रीपद मिळालं तरच एकनाथ शिंदे गट शिवसेनेत राहील, असा तिसरा प्रस्ताव असल्याची माहिती समोर येत आहे.

Leave a Reply