अहंकाराचे घर खाली ! – विनोद देशमुख

राज्यसभा आणि पाठोपाठ विधान परिषद या दोन निवडणुकांमध्ये  सत्तारूढ महा विकास आघाडीच्या पराभवाचा एका वाक्यात अर्थ असा की, अहंकारग्रस्त शिवसेनेला देवेन्द्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील या जोडीने दोनदा धोबीपछाड दिली ! कारण, या दोन्ही निवडणुका शिवसेनेमुळेच लादल्या गेल्या. राज्यसभेची एक जागा त्यांनी सोडली असती आणि त्याबदल्यात मविआने एक जागा विधान परिषदेत घेतली असती तर दोन्ही निवडणुका बिनविरोध झाल्या असत्या आणि सामना फिफ्टी-फिफ्टी असा बरोबरीत सुटला असता. परंतु “सामना” काराने असे होऊ दिले नाही ! परिणामी, मविआचे “तेलही गेले, तूपही गेले, हाती धुपाटणे आले” असे म्हणण्याची पाळी आली.
सत्तेचा माज नेत्यांना कसा आंधळा बनवतो, हे या दोन्ही निवडणुकांनी दाखवून दिले. मविआचे समर्थक असलेले बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर प्रारंभापासूनच “घोडेबाजार” शब्दावर आक्षेप नोंदवत होते. हा शब्द इतरही अनेक आमदारांनी गंभीरतेने घेतला, असे मतांच्या फाटाफुटीवरून सहज लक्षात येते. त्यात राज्यसभेच्या निकालानंतर संजय राऊतांनी आगीत तेल टाकण्याचे काम केले आणि मविआसमर्थक सहा “गद्दार” आमदारांची जाहीरपणे नावे घेतली. हे प्रकरण मविआला विधान परिषदेत भोवले, हे उघड आहे.
अर्थात् मविआच्या पराभवात शिवसेनेचा वाटा पन्नास टक्केच असला तरी, ठाकरे सरकारचा पराभव शंभर टक्के झाला, हेही तेवढेच खरे. दोन्ही निवडणुकांमध्ये सत्तारूढ आघाडीचा एकेक उमेदवार पराभूत झाला आहे. राज्यसभेच्या वेळी काॅंग्रेसने धोका दिल्याचा शिवसेनेला संशय होता. त्यामुळे यावेळी त्यांनीच तर आपला गेम केला नाही ना, अशी शंका आता काॅंग्रेस वर्तुळात व्यक्त होत आहे. तसे असेल तर “हम तो डुबे है सनम, पर तुमकोभी ले डुबेंगे” चा प्रयोगच रविवारी सादर झाला म्हणायचा !
शिवसेनेने राज्यसभेसाठी बालहट्ट केला नसता तर यातले काहीच घडले नसते. संभाजीराजे छत्रपतींच्या अपक्ष उमेदवारीला पाठिंबा देण्याऐवजी त्यांनी “मावळा” पुढे करण्याची घोडचूक केली आणि गणित बिघडत गेले. राज्यसभेत शिवसैनिक घुसविणे त्यांनी प्रतिष्ठेचे केल्यामुळेच पुढचे रामायण आणि महाभारत घडले, हे उभ्या महाराष्ट्राने पाहिले. याला म्हणतात अहंकार. भाजपाचे फडणवीस-पाटील या जोडीने हा अहंकार अत्यंत थंड डोक्याने गणित मांडून ठेचून काढला. यात गरीब बिचाऱ्या काॅंग्रेसचे फुकटाफाकटात नुकसान झाले ! असंगाशी संग असा भोवतो. त्यातही त्यांचा क्रमांक एकचा उमेदवार पडला आणि क्रमांक दोनचा निवडून आला, हे काॅंग्रेसमधील गटबाजीचे आणखी वेगळे उपकथानक घडले.
प्रश्न राहिला रडीच्या डावाचा. राज्यसभेच्या वेळी भाजपाने 3 आणि मविआने 2 मतदारांवर आक्षेप घेतले होते. त्यातील दोन्ही बाजूंचे दोन-दोन आक्षेप निकालात निघाले. शिवसेनेचे कांदे मात्र अडकले अन् त्यापायी सत्ताधाऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले ! यावेळी रीतसर परवानगी घेऊन मतदान करणाऱ्या भाजपाच्या दोन आजारी आमदारांना अपात्रतेत गोवण्याचा अयशस्वी प्रयत्न काॅंग्रेसने करून पाहिला. वरून मविआने नाकाने “कांदे” सोलले की, लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक या आजारी आमदारांना पुण्याहून मुंबईला मतदानासाठी आणणे असंवेदनशील आहे. गुन्हेगारी स्वरूपाच्या आरोपांखाली तुरुंगात असलेल्या आणि वारंवार जमानत नाकारल्या गेलेल्या नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना मतदान करता यावे म्हणून दोन्ही वेळा जंग जंग पछाडणारे किती संवेदनशील म्हणायचे ! जगताप, टिळक यांच्यासारखे कट्टर पक्षनिष्ठ आमदार असल्यामुळेच भाजपाने लागोपाठ “चमत्कार” घडवून दाखविला, हा धडा घराणेशाहीवादी पक्षांच्या व्यक्तिनिष्ठ नेत्यांनी घ्यावा, हाच या निकालांचा संदेश होय.

विनोद देशमुख

Leave a Reply